पणजी : शैलीदार अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या संघाचे नेतृत्व करेल. गोवा क्रिकेट (Cricket) असोसिएशनने कोविड (covid) कारणास्तव 22 सदस्यीय संघ जाहीर केला असून अनुभवी खेळाडूंनी पुनरागमन केले.
मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखालील संघ गुरुवारी अहमदाबादला रवाना होईल. तेथे गोव्याचे एलिट ड गट सामने होतील. विलगीकरणानंतर गोवा 17 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत ओडिशाविरुद्ध, 24 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत मुंबईविरुद्ध, तर 3 ते 6 मार्च या कालावधीत सौराष्ट्र विरुद्ध खेळेल.
कोविडपूर्वी 2019-20 मोसमात गोव्याचा संघ प्लेट गटात खेळला होता आणि त्या गटात अव्वल ठरत उपांत्यपूर्व फेरीसाठी गोव्याने पात्रता मिळविली होती. यंदा संघात निवड झालेले 29 वर्षीय अमोघ देसाई, 27 वर्षीय प्रथमेश गावस, 32 वर्षीय अमित यादव, 26 वर्षीय समर दुभाषी, 35 वर्षीय हर्षद गडेकर हे खेळाडू 2019-20 मधील रणजी मोसमात संघात नव्हते. अमोघ आता दुखापतीतून पूर्ण सावरला आहे, जीसीएतर्फे सांगण्यात आले.
यंदा (2021-22) अमित यादव व समर दुभाषी विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत खेळले होते. एकनाथ केरकर, श्रीकांत वाघ व शुभम रांजणे संघातील पाहुणे (व्यावसायिक) खेळाडू आहेत.
संघात अतिरिक्त खेळाडू निवडण्याची मुभा असल्याने 25 वर्षांखालील शदाब खान व शुभम तारी यांना संधी मिळाली. सराव शिबिरातील निहाल सुर्लकर व समीत आर्यन मिश्रा या 25 वर्षांखालील संघातील वेगवान गोलंदाजांना स्थान मिळू शकले नाही.
रणजीत स्नेहलकडे प्रथमच नेतृत्व
स्नेहल कवठणकर 26 वर्षांचा असून रणजी स्पर्धेत तो गोव्याचे प्रथमच नेतृत्व करेल. डिसेंबरमध्ये झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत तो गोव्याचा (Goa) कर्णधार होता. फेब्रुवारी 2015 मध्ये आंध्रविरुद्ध पदार्पण केल्यानंतर स्नेहल ३७ रणजी सामने खेळला आहे. 41.81 च्या सरासरीने त्याने 2300 धावा केल्या असून 5 शतके व 10 अर्धशतके नोंदविली आहेत.
गोव्याचा संघ
स्नेहल कवठणकर (कर्णधार), अमोघ देसाई, अमूल्य पांड्रेकर, सुमीरन आमोणकर, प्रथमेश गावस, आदित्य कौशिक, दर्शन मिसाळ, अमित यादव, फेलिक्स आलेमाव, लक्षय गर्ग, मलिकसाब सिरूर, समर दुभाषी, विजेश प्रभुदेसाई, सुयश प्रभुदेसाई, श्रीकांत वाघ, शुभम तारी, हेरंब परब, शदाब खान, शुभम रांजणे, एकनाथ केरकर, हर्षद गडेकर, विशंबर काहलोन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.