पणजी : ओडिशा एफसीने सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल नोंदवत सोमवारी ईस्ट बंगालचा चिवट प्रतिकार 2-1 फरकाने मोडून काढला आणि आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत प्ले-ऑफ फेरीचा दावा कायम राखला. ते आता सहाव्या क्रमांकावर आले.
वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर झालेल्या लढतीत ब्राझीलियन जोनाथस ख्रिस्तियन याने 23व्या मिनिटास ओडिशाला आघाडी मिळवून दिली, नंतर 64व्या मिनिटास क्रोएशियन अंतोनियो पेरोसोविच याच्या गोलमुळे ईस्ट बंगालने (bengal) बरोबरी साधली. 75व्या मिनिटास स्पॅनिश मध्यरक्षक हावी हर्नाडेझ याच्या गोलमुळे ओडिशाला पुन्हा वर्चस्व मिळाले.
हाच गोल अखेरीस निर्णायक ठरला. ओडिशाचा हा 15 लढतीतील सहावा विजय ठरला असून त्यांचे 21 गुण झाले आहेत. ईस्ट बंगालला 16 लढतीत आठवा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे 10 गुणांसह त्यांचा दहावा क्रमांक कायम राहिला. ईस्ट बंगाल सलग दुसऱ्या वर्षी साखळी फेरीतच गारद होणार यावर या निकालाने शिक्कामोर्तब झाले.
ईस्ट बंगालच्या बचावफळीतील गलथानपणाचा लाभ उठवत ओडिशाने पूर्वार्धात आघाडी घेतली. हावी हर्नांडेझने चेंडूवर ताबा राखत ईस्ट बंगालच्या काही बचावपटूंना चकवा दिला आणि गोलनेटसमोर असलेल्या जोनाथस ख्रिस्तियन याला छान पास दिला. ब्राझीलियन आघाडीपटूने उजव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक शंकर रॉय याला चेंडू अडविण्याचा संधीच दिली नाही. 32 वर्षीय जोनाथसचा हा मोसमातील सहावा गोल ठरला.
तासाभराच्या खेळानंतर ईस्ट बंगालने प्रतिहल्ला चढविला. फ्रान्यो प्रसे याने मध्यक्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला आणि ओडिशाच्या बचावफळीस निष्प्रभ ठरवत अंतोनियो पेरोसेविच याला सुरेख पास दिला. क्रोएशियन खेळाडूने डाव्या पायाच्या प्रेक्षणीय फटक्यावर ईस्ट बंगालला बरोबरी साधून दिली. त्याचा हा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला.
सामन्यातील पंधरा मिनिटे बाकी असताना जोनाथस ख्रिस्तियन व हावी हर्नांडेझ जोडगोळीने पुन्हा ईस्ट बंगालला दणका दिला. यावेळी हावीने जोनाथसच्या असिस्टवर गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. जोनाथस याने ईस्ट बंगालच्या पाच खेळाडूंना मागे टाकत मुसंडी मारली आणि हावीला सुरेख पास पुरविला. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना ओडिशाला आणखी एक गोल करण्याची आयती संधी होती. गोलरक्षक जाग्यावर नसताना हावीच्या फटक्यावर ईस्ट बंगालचा गोलरक्षक हिरा मोंडल याने गोलरेषेवरून ऐनवेळी चेंडू परतावत संघावरील संकट टाळले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.