पणजी: पंजाबच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांवर वरचष्मा राखला, त्यामुळे 19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर शनिवारी पाहुण्या संघाने 7 बाद 342 धावा केल्या. सामना सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू आहे.
(Punjab won the Cuchbehar Karandak cricket match defeating Goa)
गोव्याच्या फिरकी गोलंदाजांना दिवसाच्या उत्तरार्धात सूर गवसला. त्यामुळे पंजाबला 93 धावांत 5 गडी गमावावे लागले. गोव्यातर्फे कर्णधार ऑफस्पिनर दीप कसवणकर याने चार, तर डावखुरा फिरकी गोलंदाज शिवांक देसाई याने दोन गडी बाद केले. वेगवान गोलंदाज पुंडलिक नाईक याला क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागल्याने दुखापत झाली. त्याच्या हाताला टाके घालावे लागले, त्यामुळे गोव्याला फिरकीवर जास्त अवलंबून राहावे लागले.
शिवेनचे दमदार शतक
पंजाबचा सलामीवीर शिवेन रखेजा याने दमदार शतक ठोकत दोन महत्त्वपूर्ण भागीदारी केली. जालंधरच्या या शैलीदार फलंदाजाने 192 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. डावखुरा जसकिरत सिंग याने अर्धशतक नोंदविताना 70 चेंडूत नऊ चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. दीप कसवणकर याने सनथ नेवगी याच्याकरवी जसकिरत याला बाद करून गोव्याला पहिले यश मिळवून दिले.
शिवेन व जसकिरत यांनी 94 धावांची सलामी दिली. नंतर शिवेनने कर्णधार उदय सहारन याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी करून पंजाबला भक्कम स्थिती गाठून दिली. उदयने 96 चेंडूंत 10 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 71 धावा नोंदविल्या. रणदीप सिंग याने आक्रमक फलंदाजी करताना 38 चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांच्या मदतीने 40 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
पंजाब, पहिला डाव: 90 षटकांत 7 बाद 342 (शिवेन रखेजा 113, जसकिरत सिंग 50, आर्यन यादव 15, उदय सहारन 71, रणदीप सिंग 40, मयांक गुप्ता 18, आर्यन भाटिया 27, फरदीन खान 13-2-50-0, पुंडलिक नाईक 7-2-22-0, यश कसवणकर 26-5-89-1, दीप कसवणकर 31-2-135-4, शिवांक देसाई 13-0-45-2)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.