Messi vs Ronaldo: फुटबॉल दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोघांनाही खेळताना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
त्यातही जेव्हा हे दोघेही आमने-सामने येतात, तेव्हा चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. त्यांच्यात नेहमीच कडवी झुंज पाहायला मिळते. गुरुवारी रात्री उशीरा देखील या दोघांमध्ये अशीच चूरस चाहत्यांना पाहायला मिळाली.
गुरुवारी रात्री सौदी अरेबिया ऑल स्टार इलेव्हन संघ (Riyadh All Star XI) विरुद्ध पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) हे संघ आमने-सामने आले होते.
रियाधमधील किंग फाहद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या या सामन्यात पीएसजी संघाने रोनाल्डोच्या नेतृत्वातील सौदी अरेबिया ऑल स्टार इलेव्हनविरुद्ध 5-4 अशा गोलफरकाने विजय मिळवला.
या सामन्यात पीएसजीने सुरुवातीलाच आघाडी घेण्यात यश मिळवले होते. अर्जेंटिनाचा विश्वविजेता कर्णधार मेस्सीने पीएसजीसाठी तिसऱ्याच मिनिटाला पहिला गोल केला.
त्यानंतर काहीवेळ दोन्ही संघांकडून कोणालाही गोल करता आला नाही. पण, 34 व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करत ऑल स्टार इलेव्हनला बरोबरी साधून दिली.
त्यानंतर 9 मिनिटांनी लगेचच पीएसजीकडून मार्क्विनहोसने दुसरा गोल केला. पण रोनाल्डोने पीएसजीची ही आघाजी पहिल्या हाफच्या अखेरीस टिकू दिली नाही. त्याने पहिल्या हाफच्या भरपाई वेळात दुसरा गोल नोंदवला.
दरम्यान, पहिल्या हाफच्या अखेरीस पीएसजीकडून खेळणाऱ्या नेमारकडून पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आले होते.
दुसऱ्या हाफमध्येही दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ पाहायला मिळाला. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच ऑल स्टार इलेव्हनकडून गोलसाठी प्रयत्न झाला. पण पीएसजीचा गोलरक्षक किलोर नावाने चांगला बचाव केला.
नंतर काही वेळातच सामन्याच्या 54 व्या मिनिटाला सर्जिओ रामोसने पीएसजीसाठी तिसरा गोल केला. मात्र, त्यांची ही आघाडी 2 मिनिटापेक्षा अधिक काळ टिकली नाही. कारण ऑल स्टार इलेव्हनकडून ह्यून-सो जँगने गोल करत बरोबरी साधून दिली.
पण, पीएसजीने नंतर वर्चस्व राखले. 60 मिनिटाला कायलिन एमबाप्पेने पेनल्टीवर आणि 78 व्या मिनिटाला ह्यूगो एकिटिके यांनी पीएसजीसाठी एकापाठोपाठ एक गोल करत आघाडी मिळवून दिली.
पण भरपाई वेळेत अँडरसन तालिस्काने ऑल स्टार इलेव्हनसाठी चौथा गोल करत पीएसजीची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. पण ही आघाडी भरून काढण्यासाठी उशीर झाला आणि पीएसजीने हा सामना जिंकला.
दरम्यान, रोनाल्डोने अल-नासर संघाबरोबर करार केल्यानंतरचा त्याचा सौदी अरेबियामधील पहिलाच सामना होता. सौदी अरेबिया ऑल स्टार इलेव्हन संघ अल नासर आणि अल हिलाल क्लबमधील खेळाडूंचा मिळून तयार करण्यात आलेला.
दरम्यान गुरुवारी झालेल्या या सामन्यात रोनाल्डोने केलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. आता रोनाल्डो अल नासर क्लबकडून पहिल्यांदाच रविवारी खेळताना दिसणार आहे. रविवारी अल नासरचा सामना अल इत्तिफाक विरुद्ध होणार आहे.
दोन वर्षांनंतर मेस्सी-रोनाल्डो आमने-सामने
मेस्सी आणि रोनाल्डो हे दोघे दोन वर्षांनंतर आमने-सामने आले होते. यापूर्वी ते अखेरचे डिसेंबर 2020 मध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यावेळी मेस्सी बार्सिलोना क्लबकडून आणि रोनाल्डो युवेंटस क्लबकडून खेळत होता. त्यावेळी युवेंटसने बार्सिलोनाला 3-0 अशा फरकाने पराभूत केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.