Cristiano Ronaldo: पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियातील अल-नासर क्बलबरोबर करार केला आहे. त्यानंतर आता मंगळवारी अल-नासर क्लबने त्याच्या किटचे मर्सूल पार्क स्टेडियममध्ये अनावरण केले. यावेळी रोनाल्डोही नव्या संघाची जर्सी घालून स्टेडियममध्ये उपस्थिती होता.
अनावरणानंतर तो पत्रकार परिषदेसाठीही उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर भाष्य केले. त्याने असेही म्हटले की तो या निर्णयाबद्दल खूश आहे. या कार्यक्रमादरम्यान रोनाल्डोबरोबर त्याचे कुटुंबियही उपस्थित होते. त्याचा कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओही अल-नासर क्लबने शेअर केला आहे.
रोनाल्डो म्हणाला, 'स्वागत शानदार होते. मला नवीन पिढीची मानसिकता बदलायची आहे. युरोप, ब्राझील, अमेरिका, पोर्तुगालमध्ये मला अनेक संधी होत्या. अनेकांनी माझ्याशी करार करण्याचा प्रयत्न केला. पण मी या क्बलला शब्द दिलेला होता.'
'मला काय हवे आहे आणि काय नको, हे माहित आहे. मला अनेक गोष्टींमध्ये आणि अल-नासरच्या महिला संघालाही मदत करायची आहे. मला अनेक लोकांचे दृष्टीकोन बदलायचे आहेत.'
पाचवेळा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकलेला रोनाल्डो म्हणाला, 'आता कोणताही सामना जिंकणे सोपे राहिलेले नाही. फुटबॉलमधील उत्क्रांती वेगळी आहे आणि मध्यपूर्वेत आल्याने माझ्या कारकिर्दीचा शेवट झालेला नाही. माझ्यासाठी मी इथे येऊन खूप खूश आहे.'
'मला माहित आहे लीग स्पर्धात्मक आहे. मी अनेक सामने पाहिले आहेत. मला हा निर्णय घेतल्याचा आणि माझ्या कारकिर्दीचा अभिमान आहे. माझे युरोपमधील काम संपले आहे. मी जवळपास सर्व महत्त्वाच्या संघांकडून खेळलो आहे.'
त्याला यापूर्वी अनेक संधी मिळाल्या होत्या, असेही रोनाल्डोने सांगितले. तो म्हणाला, 'मी आता हे सांगू शकतो की युरोप, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्समध्ये अगदी पोर्तुगालमधील अनेक क्लब्स माझ्याबरोबर करार करू इच्छित होते. पण मी या संघाला शब्द दिला होता की फक्त फुटबॉल नाही, तर इथे देशातील अनेक ठिकाणांचा विकास करेल. माझ्यासाठी माझे ज्ञान आणि अनुभवाने महत्त्वाचा क्लबचा विकास करण्याची ही चांगली संधी आहे.'
त्याच्या संघातील सहभागाबद्दल अल-नासरचे प्रशिक्षक रुडी गार्सिआ यांनीही आनंद व्यक्त केला. रोनाल्डो पत्रकार परिषदेनंतर मैदानाच्या मध्यभागीही गेला होता. तिथे हजारो चाहते होते. रोनाल्डोने परत जाताना त्याच्या संघसहकाऱ्यांचीही भेट घेतली. तसेच आशियामधील क्बलशी जोडला जाण्याबद्दल आनंद व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.