ICC World Cup 2023 Semi-Final Equation:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी (11 नोव्हेंबर) उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या चौथ्या संघाचा अंतिम निर्णय होणार आहे. उपांत्य फेरीत भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी स्थान पक्के केले आहे. पण चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा आहे.
सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर 9 सामन्यांतील 5 सामने जिंकून 10 गुणांसह न्यूझीलंड आहे. तसेच पाकिस्तान 8 सामन्यांतील 4 सामने जिंकून 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. पण पाकिस्तानला अद्याप अजून अखेरचा साखळी सामना खेळायचा आहे.
पाकिस्तानचा अखेरचा साखळी सामना शनिवारी दुपारी 2 वाजता इंग्लंड विरुद्ध कोलकातामधील ईडन गार्डन्सवर सुरु होईल. हाच सामना उपांत्य फेरीचे समीकरण ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
कारण, हा सामना पाकिस्तानने पराभूत झाला, तर न्यूझीलंड थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. मात्र, जर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला, तर त्यांचेही 10 गुण होतील. अशाच नेट रनरेट खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
सध्या न्यूझीलंडचा नेट रनरेट हा पाकिस्तानपेक्षा खूप चांगला आहे. त्यामुळे न्यूझीलंडला नेट रनरेटमध्ये मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी केली, तर कमीत कमी 287 धावांनी विजय मिळवावा लागेल.
तसेच जर त्यांनी प्रथम गोलंदाजी केली, तर त्यांना इंग्लंडला 50 धावांत सर्वबाद करून 2 षटकात धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल किंवा 100 धावांत रोखत 3 षटकात धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल. जर असे झाले, तरच पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहचणार आहे. पण हे समीकरण पाकिस्तानला साधता आले नाही, तर न्यूझीलंडचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होईल.
त्यामुळेच पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील शनिवारी होणारा सामना निर्णायक आहे. जोपर्यंत या सामन्याचा निकाल समोर येणार नाही, तोपर्यंत उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चौथ्या संघावर शिक्कामोर्तब होणार नाही.
दरम्यान, भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पक्के केले आहेत. त्यामुळे त्यांचा उपांत्य सामना गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाविरुद्ध होणार आहे. त्याचमुळे शनिवारीच भारत उपांत्य सामना कोणाविरुद्ध खेळणार, हे देखील निश्चित होईल.
तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे.
दरम्यान, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड्स या पाचही संघांचे आव्हान संपले आहे. या पाचही संघांना उपांत्य फेरीत पोहण्यात अपयश आले.
त्यातही अफगाणिस्तान शेवटपर्यंत शर्यतीत होते. पण अखेरच्या दोन्ही साखळी सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला आणि त्यांना या शर्यतीत बाहेर व्हावे लागले. अफगाणिस्तानने ९ पैकी 4 सामने जिंकले.
तसेच त्यांच्यापूर्वीच इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड्स यांना 3 पेक्षा अधिक सामने जिंकता आले नाहीत, त्यामुळे त्यांचेही आव्हान संपले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.