Afghanistan's Ibrahim Zadran joins Sachin Tendulkar in Elite Club:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शुक्रवारी (10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्यान 21 वर्षीय क्रिकेटपटू इब्राहिम झाद्रानने एक मोठा पराक्रम केला आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याकडून रेहमनुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान हे सलामीला फलंदाजीला उतरले. या दोघांनी चांगली सुरुवातही केली होती.
मात्र, 9 व्या षटकात गुरबाजला 25 धावांवर केशव महाराजने बाद केले, तर पुढच्याच षटकात झाद्रानला गेराल्ड कोएत्झीने यष्टीरक्षक क्विंटन डी कॉककडे झेल देण्यास भाग पाडले. झाद्रानने 15 धावा केल्या.
मात्र, असे असले तरी झाद्रानने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 350 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्या यंदाच्या स्पर्धेत 9 डावात 47 च्या सरासरीने 376 धावा झाल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे.
त्यामुळे तो वयाची 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी एका वनडे वर्ल्डकपमध्ये 350 धावांचा टप्पा पार करणारा केवळ दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 1996 वर्ल्डकपमध्ये वयाच्या 22 व्या वर्षी पूर्ण करण्यापूर्वी 523 धावा ठोकल्या होत्या.
तसेच वयाची 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी एका वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत झाद्रानने ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे. लारा यांनी 1992 साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत वयाची 23 वर्षे पूर्ण करण्याआधी 333 धावा ठोकल्या होत्या.
वयाची 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी एका वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटर
523 धावा - सचिन तेंडुलकर (1996)
376 धावा - इब्राहिम झाद्रान (2023)
333 धावा - ब्रायन लारा (1992)
298 धावा - उपुल थरंगा (2007)
283 धावा - सचिन तेंडुलकर (1992)
282 धावा - विराट कोहली (2011)
280 धावा - रेहमनुल्लाह गुरबाज (2023)
दरम्यान, गुरुवारी न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवण्याने अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
त्यांचे आव्हान अद्याप अधिकृतरित्या संपले नसले, तरी त्यांना उपांत्य फेरीत जाण्यासाठी नेट रनरेटने न्यूझीलंडला मागे टाकावे लागेल आणि त्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवून चमत्करीक कामगिरीची अपेक्षा करावी लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.