पणजी: वैयक्तिक अर्धशतकानंतर अजिंक्य रहाणे सातव्या विकेटच्या रुपात बाद झाला तेव्हा मुंबई पाशी फक्त 44 धावांची आघाडी होती. रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट स्पर्धेत 41 वेळच्या माजी विजेत्यांवर गोवा तिसऱ्याच दिवशी धक्कादायक विजय मिळवू शकेल असे वाटत असताना त्यांनी नामी संधी दवडली.
मुंबईचे (Mumbai) तळातील फलंदाज खेळपट्टीवर नवे असताना फिरकी अस्त्राचाच जास्त वापर झाला, गोव्याच्या (Goa) कर्णधाराने संघातील वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखविला नाही. शम्स मुलानी व तनुष कोटियन यांनी चिवट प्रतिकार करत आठव्या विकेटसाठी 114 धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे शनिवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा मुंबईपाशी 158 धावांची आघाडी जमा झाली.
मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi) एलिट ड गट सामना सुरू आहे. तिसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा मुंबईने दुसऱ्या डावात 7 बाद 322 धावा केल्या होत्या. रविवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. मुंबईची आघाडी किती फुगते आणि शेवटच्या दिवशी खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सामोरे जाण्याचे गोव्याच्या फलंदाजांचे कसब यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.
तळाच्या फलंदाजांची चमक
दिवसअखेर तनुष कोटियन 57, तर शम्स मुलानी 49 धावांवर खेळत होता. या जोडीने 210 चेंडूंत 114 धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबईला गोव्याचे वर्चस्व झुगारून लावता आले. चौथा रणजी सामना खेळणाऱ्या तनुषने दुसऱ्यांदा अर्धशतक नोंदविले. सौराष्ट्रविरुद्ध मागील लढतीत त्याने नाबाद 50 धावा केल्या होत्या. शनिवारी त्याने 89 चेंडूंचा सामना करताना पाच चौकार व एक षटकार मारला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सातव्या अर्धशतकापासून मुलानी एक धाव दूर आहे. त्याने 129 चेंडूंतील खेळीत चार वेळा चेंडू सीमापार धाडला.
रहाणे-सर्फराजची भागीदारी
सकाळच्या सत्रात वेगवान श्रीकांत वाघ, मध्यमगती शुभम रांजणे व ऑफस्पिनर अमित यादव या गोव्याच्या गोलंदाजांनी कालच्या 1 बाद 57 वरून मुंबईला 4 बाद 93 असे कोंडीत पकडले. अनुभवी रहाणेने फॉर्ममधील सर्फराजला साथीला घेत पाचव्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र अमित यादव व डावखुरा फिरकीपटू दर्शन मिसाळ यांनी 33 धावांत 3 झटके दिल्यामुळे मुंबईचा डाव 7 बाद 208 असा गडगडला. दर्शनच्या गोलंदाजीवर पायचीत होण्यापूर्वी सर्फराजने 72 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. नंतर आदित्य तरे (8) याला दर्शनने कर्णधार स्नेहल कवठणकर याच्याकरवी झेलबाद केले. अमितच्या गोलंदाजीवर रहाणेचा शुभम रांजणेने झेल पकडल्यामुळे मुंबईस मोठा धक्का बसला. भारताच्या माजी कसोटी कर्णधाराने 148 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने संयमी 56 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई, पहिला डाव: 163 व दुसरा डाव (1 बाद 57 वरून) : 106 षटकांत 7 बाद 322 (आकर्षित गोमेल 15, धवल कुलकर्णी 3, सचिन यादव 19, अजिंक्य रहाणे 56, सर्फराज खान 48, आदित्य तरे 8, शम्स मुलानी नाबाद 49, तनुष कोटियन नाबाद 57, लक्षय गर्ग 11-4-36-0, अमित यादव 38-5-111-2, दर्शन मिसाळ 33-6-76-3, अमूल्य पांड्रेकर 13-0-32-0, श्रीकांत वाघ 4-0-12-1, शुभम रांजणे 7-1-15-1).
गोवा, पहिला डाव : 327.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.