"बाबर आझमकडे सिक्स मारण्याची क्षमताच नाही...", LIVE मॅचमध्ये मोहम्मद कैफनं काढली लायकी Watch Video
टी-२० विश्वचषक २०२६ च्या आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडवर निसटता विजय मिळवला असला तरी, संघाचा स्टार फलंदाज बाबर आझम पुन्हा एकदा टीकेचा धनी ठरला आहे. नेदरलँडसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध बाबरला धावांसाठी संघर्ष करावा लागला, ज्यावरून भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी समालोचन (Commentary) करताना बाबरची सरेआम फिरकी घेतली. "बाबरमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमताच नाही," अशा शब्दांत कैफने त्याची खिल्ली उडवली.
षटकार मारण्याच्या प्रयत्नात विकेट
नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात बाबर आझम १८ चेंडू खेळून केवळ १५ धावा करू शकला. त्याच्या या संथ खेळीत केवळ एकच चौकार समाविष्ट होता. डावाच्या एका टप्प्यावर धावांचा वेग वाढवण्यासाठी बाबरने पुढे जात षटकार मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे नेण्याइतकी ताकद त्याच्या फटक्यात नव्हती आणि तो झेलबाद झाला. त्याच्या याच शॉट निवडीवर कैफने कडाडून टीका केली, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
कैफचा खोचक टोला: "हे त्यांच्या अवाक्याबाहेर आहे"
कमेंट्री दरम्यान मोहम्मद कैफ म्हणाला, "तुम्ही म्हणालात षटकार मारा, पण तो कुठे मारू शकला? सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मोठे फटके मारणे ही बाबरची ताकद नाही. षटकार मारण्याची त्याची शैलीच नाही.
एकेरी-दुहेरी धावा काढून डाव सावरणे ही त्याची पद्धत आहे, पण जिथे तो मोठे शॉट मारायला जातो, तिथे तो बाद होतो." कैफच्या या विधानाने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
फॉर्मचा प्रश्न
बाबर आझमच्या टी-२० मधील खेळण्याच्या पद्धतीवर आधीच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. १४० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळूनही त्याचा स्ट्राइक रेट केवळ १२८ च्या आसपास आहे, जो आधुनिक क्रिकेटच्या मानाने खूपच कमी समजला जातो.
अलीकडेच ऑस्ट्रेलियातील 'बिग बॅश लीग'मध्येही बाबरला आपली छाप पाडता आली नव्हती. तिथेही त्याने १०३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यातील अपयशामुळे आता बाबरच्या क्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

