Naveen-ul-Haq Instagram Story: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत आहे. दरम्यान, याच हंगामात 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना झाला होता. हा सामना खेळाडूंच्या वादामुळे चांगलाच चर्चेत आला.
या सामन्यात बेंगलोरचा खेळाडू विराट कोहलीचे लखनऊचा खेळाडू नवीन उल हक आणि मार्गदर्शन गौतम गंभीर यांच्याबरोबर मोठे वाद झाले. या वादाची चर्चा अजूनही सुरू आहे. दरम्यान आता नवीन उल हकने केलेल्या क्रिप्टिक पोस्टमुळे पुन्हा हा वाद चर्चेत आला आहे.
मंगळवारी (9 मे) मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 200 धावांचे आव्हान तब्बल 21 चेंडू राखून आणि 6 विकेट्स राखून पूर्ण करत विजय मिळवला.
नवीनने याच सामन्यातील काही क्षणचित्रे इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. यातून तो आंबे खात टीव्हीवर हा सामना पाहात असल्याचे लक्षात येते. त्याने या सामन्यात जेव्हा विराट 4 चेंडूत 1 धाव करून बाद झाला, तेव्हाच्या क्षणाचा एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिले की 'गोड आंबे (Sweet mangoes)'
त्यानंतर त्याने ज्यावेळी मुंबईला विजयासाठी 27 चेंडूत केवळ 8 धावांची गरज होती, तेव्हाचा एक फोटो शेअर केला. यावेळी त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की 'या आंब्यांबरोबर राऊंड 2. मी खाल्लेल्या सर्वोत्तम आंब्यांपैकी एक. धवल परब भाई धन्यवाद.'
दरम्यान, नवीनने या पोस्ट का टाकल्या याचा स्पष्ट खुलासा केला नसला, तरी अनेक क्रिकेट चाहत्यांनी अंदाज बांधले आहेत, की त्याने विराटला आणि बेंगलोर संघाला डिवचण्यासाठी या पोस्ट केल्या आहेत.
यापूर्वी विराटनेही लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडिमवर झालेल्या सामन्यावेळी इंस्टाग्राम स्टोरी शेअर केल्या होत्या. त्या सामन्यात लखनऊविरुद्ध शानदार खेळी केलेल्या वृद्धिमान साहाचे आणि एक शानदार झेल घेतलेल्या राशीद खानचे कौतुक करणाऱ्या पोस्ट त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्या होत्या. यावेळीही चाहत्यांनी त्याने गंभीर आणि नवीनबरोबर झालेल्या वादामुळेच या पोस्ट केल्याचा कयास लावला होता.
नवीनने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर गंभीरबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोला त्याने कॅप्शन दिले की 'लोकांशी तुम्हाला जसे वागायचे आहे, तसे तसे त्यांना वागवा. तुमच्याशी ते ज्यापद्धतीने बोलले आहेत, त्या पद्धतीने लोकांशी बोला.'
त्याच्या या पोस्टवर गंभीरनेही 'कधीही बदलू नकोस; अशी कमेंटही केलेली. नवीनच्या या पोस्टनंतर अनेक सोशल मीडिया युजर्सने असा कयास लावला होता की त्याने विराटवर झालेल्या वादाबद्दल अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
दरम्यान, 1 मे रोजी झालेल्या वादानंतर आयपीएलच्या आचार संहितेचा भंग झाल्याने बीसीसीआयकडून कारवाई झाली. विराट आणि गंभीरवर सामनाशुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला होता, तर नवीनवर सामनाशुल्काच्या 50 टक्के दंड झाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.