Women’s National Boxing Championships: टोकियो ऑलिम्पिक पदक विजेती लवलिना बोर्गोहेन आणि वर्ल्ड चॅम्पियन निखत झरिन यांनी अपेक्षेप्रमाणेच 6 व्या एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. याबरोबरच या स्पर्धेत 10 पदकांसह रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने संघ म्हणून विजय मिळवला आहे.
आसामची बॉक्सर लवलिनाने 75 किलोग्रॅम वजनी गटातील अंतिम सामन्यात सर्विसेसच्या अरुंधती चौधरीला 5-0 अशा फरकाने पराभूत केले आहे. यासह तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच झरिनला मात्र रेल्वेच्या अनामिकाने अंतिम सामन्यात तगडे आव्हान दिले.
तेलंगणाच्या झरिनने 50 किलो वजनीगटात अनामिकाचा सामना केला. दरम्यान, या सामन्यात झरिनने 4-1 अशा फरकाने विजय मिळवत तिचे विजेतेपद राखले.
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना केंद्रिय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या काही अधिकाऱ्यांच्या हस्ते पदकांनी गौरविण्यात आले.
रेल्वेकडून मंजू राणीने पहिले सुवर्णपदक जिंकले. तिने तमिळनाडूच्या एस कालैवानीला 5-0 अशा फरकाने 48 किलोग्रॅम वजनी गटातील अंतिम सामन्यात पराभूत केले. तसेच रेल्वेकडून शिक्षा (54 किलोग्रॅम वजनी गट), पुनम (60 किलोग्रॅम वजनी गट), शशी चोप्रा (63 किलोग्रॅम वजनी गट) आणि नुपूर (+81 किलोग्रॅम वजनी गट) यांनी सुवर्णपदकाची गवसणी घातली.
मध्यप्रदेशने एक सुवर्णपदक, दोन रौप्यपदके आणि 5 कांस्यपदकांना गवसणी घातली. यासह ते स्पर्धेत रेल्वेनंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तसेच हरियाणाने दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई करत तिसरा क्रमांक पटकावला.
या संपूर्ण स्पर्धेत 302 बॉक्सर्स सहभागी झाले होते. त्यांनी 12 वेगवेगळ्या वजनी गटात सामने खेळले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.