

जागतिक महिला क्रिकेटमधील सर्वात घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक मानली जाणारी न्यूझीलंडची स्टार खेळाडू ली ताहुहू हिने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. ताहुहूने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधून तातडीने निवृत्ती जाहीर केली असून, तिच्या १५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा एक अध्याय आता संपुष्टात आला आहे. या निर्णयामुळे कीवी चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी असली, तरी तिने भविष्यातील आव्हानांसाठी हा धाडसी निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
ली ताहुहूने हा निर्णय अचानक घेतला असला, तरी त्यामागे एक ठोस रणनीती आहे. २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये महिला टी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आपल्या वयाचा आणि तंदुरुस्तीचा विचार करता, ताहुहूला आता आपला संपूर्ण वेळ आणि ऊर्जा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटवर खर्च करायची आहे. २०२४ मध्ये न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक जिंकला होता, आता ते जेतेपद राखण्यासाठी ती सज्ज झाली आहे. तिने स्पष्ट केले की, तिला टी-२० क्रिकेटमध्ये अजून बरेच योगदान द्यायचे आहे
ताहुहूने २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. गेल्या दीड दशकात ती न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा कणा राहिली आहे.
तिने आपल्या कारकिर्दीत एकूण १०३ एकदिवसीय सामने खेळले असून, २०१३, २०१७, २०२२ आणि २०२५ अशा चार विश्वचषकांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२५ बळी असून, न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारी महिला गोलंदाज म्हणून तिने इतिहास रचला आहे.
२०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळलेला सामना हा तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील अखेरचा ठरला. आपल्या भावना व्यक्त करताना ताहुहू म्हणाली, "एकदिवसीय फॉरमॅटमध्ये देशासाठी खेळणे हा माझ्यासाठी सन्मान होता, पण आता नवीन पिढीसाठी जागा निर्माण करण्याची आणि टी-२० मध्ये माझे सर्वोत्तम देण्याची वेळ आली आहे." तिच्या या निर्णयामुळे न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीच्या फळीत मोठी पोकळी निर्माण होणार असली, तरी टी-२० मध्ये तिच्या उपस्थितीमुळे संघाला मोठी ताकद मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.