Goa Literature: ‘रद्दीतल्या मोठेपणा’चा मोह सोडून ‘शब्दांच्या सत्या’चा शोध घेईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने गोमंतकीय साहित्याची पहाट होईल.

Goa Literary Politics: जेव्हा साहित्यिक ‘रद्दीतल्या मोठेपणा’चा मोह सोडून ‘शब्दांच्या सत्या’चा शोध घेईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने गोमंतकीय साहित्याची पहाट होईल.
Goa Literature
Goa LiteratureDainik Gomantak
Published on
Updated on

आमोद कुलकर्णी

गोव्याच्या सांस्कृतिक आणि निसर्गदत्त भूमीत साहित्याचा गंध पूर्वापार जपला गेला आहे. पण आजच्या काळात साहित्याचा सुकाळ झाला आहे असं वाटत असतानाच, एक विचित्र विसंगती प्रकर्षाने जाणवू लागली आहे. हा साहित्याचा सुकाळ नसून ‘साहित्यिक’ म्हणवून घेणाऱ्यांचा एक बाजार भरला आहे.

आज गल्लीबोळात असे स्वयंभू लेखक आणि कवी निर्माण झाले आहेत, ज्यांना साहित्यातील रसापेक्षा प्रसिद्धीच्या रसात आणि फोटोतल्या झगमगाटात जास्त रस वाटतो. स्वतःच्या प्रतिभेची झोळी फाटलेली असताना, केवळ ‘जनसंपर्क मॅनेजमेंट’च्या जोरावर हे लोक स्वतःला साहित्याचे महामेरू समजायला लागले आहेत.

या तथाकथित साहित्यिकांचा सगळा आटापिटा केवळ ‘नावा’साठी असतो. एखाद्या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत किंवा वर्तमानपत्राच्या बातमीत त्यांचे नाव जर अनवधानाने गाळले गेले, तर हे साहित्यिक तातडीने रुसतात, चिडतात. आपला अपमान झाल्याचा आव आणतात.

साहित्याची सेवा करण्यापेक्षा माझे नाव कुठे आहे? हे शोधण्यातच यांची शक्ती खर्च होते. व्यासपीठावर समोरच्या रांगेत जागा मिळवण्यासाठी होणारी यांची धडपड आणि नावासाठीची लाचारी पाहिली की, साहित्याचा दर्जा कुठे घसरला आहे याची जाणीव होते. ज्यांना शब्दांपेक्षा आपल्या नावाच्या अक्षरांच्या आकाराची काळजी जास्त असते, त्यांनी साहित्याचा केवळ एक मुखवटा चढवलेला असतो.

गोव्यासारख्या लहान राज्यात जिथे प्रत्येक दुसऱ्या घरात एक कवी दडलेला असतो, तिथे आता साहित्यापेक्षा ‘साहित्यिक राजकारण’ जोरात सुरू आहे.

स्वतःचा एक छोटासा गट तयार करायचा, एकमेकांच्या पुस्तकांचे अनावरण करायचे आणि एकमेकांनाच थोर ठरवून टाकायचे, ही एक नवी ‘सिस्टीम’ इथे रुजली आहे. हे लोक केवळ मोठ्या लोकांसोबत फोटो काढून आणि वर्तमानपत्रात स्वतःच्या बातम्या पेरून मोठेपणाचा मुखवटा चढवत आहेत. घराणेशाही आणि आप्तेष्टांना पुरस्कारांच्या रांगेत उभे करण्याची लाचार हुजरेगिरी आजच्या साहित्याला जडलेली वाळवी आहे.

मुळात, साहित्याची भरभराट ही फक्त सरकारी अनुदानावर किंवा वर्तमानपत्रातल्या फोटोवर होत नसते. ती लेखकाच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते.

गोव्यातील साहित्याचा (मराठी असो वा कोकणी) दर्जा सुधारायचा असेल, तर सर्वात आधी ही ‘कोंडाळी’ आणि ‘गटबाजी’ मोडीत काढली पाहिजे. आज गोव्यात साहित्याची समीक्षा मृतावस्थेत आहे. कोणी काहीही लिहिले की त्याचे कौतुक करणारे ‘भाट’ पुष्कळ आहेत, पण त्यातल्या त्रुटी दाखवणारा ‘टीकाकार’ नाही. जोपर्यंत साहित्यावर सडेतोड आणि तटस्थ चर्चा होत नाही, तोपर्यंत लेखकाला आपल्या लेखनातील उणिवा समजणार नाहीत.

आजच्या लेखकाला लिहिण्यापेक्षा ‘दिसण्याची’ घाई जास्त आहे. दोन कविता लिहिल्या की लगेच पुस्तक छापण्यापेक्षा, जागतिक साहित्याचा अभ्यास करणे आणि वाचन वाढवणे आवश्यक आहे.

साहित्याची भिस्त आता शब्दांवर नसून ‘फोटो’वर अवलंबून आहे, हे चित्र बदलण्याची गरज आहे. केवळ जाहिरातबाजीने आणि पीआर स्टंटने कुणीही मोठा साहित्यिक होत नाही. जेव्हा साहित्यातून सत्त्व हरवते, तेव्हा उरते ती फक्त पोकळ प्रसिद्धी.

एक गोष्ट हे तथाकथित साहित्यिक विसरतात की, ज्या कागदावर तुमची पोकळ स्तुती छापून आली आहे, तो कागद केवळ रद्दी होणार आहे.

Goa Literature
Goa Arts & Literature Festival: रंगत 'गोवा आर्ट्स अँड लिटरेचर फेस्टिवल'ची! गोमंतकीय रसिकांना मिळणार समृद्ध अनुभव; जाणून घ्या डिटेल्स

साहित्याची ही ‘रद्दीतली श्रीमंती’ अल्पजीवी आहे. ज्या साहित्यात लोकांचे दुःख नाही, समाजाचे प्रतिबिंब नाही आणि केवळ स्वतःचे स्तोम माजवण्याची हाव आहे, ते साहित्य कचऱ्याच्या कुंडीतच जमा होणार. साहित्याचा वारसा हा शब्दांनी कमावला जातो, तो फोटोबाजीने विकत घेता येत नाही. जेव्हा साहित्यिक ‘रद्दीतल्या मोठेपणा’चा मोह सोडून ‘शब्दांच्या सत्या’चा शोध घेईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने गोमंतकीय साहित्याची पहाट होईल.

Goa Literature
Digitization of Books: गोव्यातील दुर्मिळ दस्तावेज होणार 'डिजिटल'! 8 लाख पानांचे काम पूर्ण; चाळीस हजार पुस्तकांचे संवर्धन

याच वृत्तीवर प्रकाश टाकणारी एक मार्मिक कविता:

रद्दीतला मोठेपणा

शब्दांचे सत्त्व हरवले पण मुखवटे झाले गोड,

साहित्यापेक्षा जास्त इथे प्रसिद्धीचीच ओढ.

कवितेच्या ओळींपेक्षा फोटोंना चढला भाव,

चोरलेल्या साहित्यावरती ठळक आपले नाव.

पुरस्कारांच्या रांगेसाठी लाचारीची हौस,

प्रतिभेच्या विहिरीत आता स्वार्थाचाच पाऊस.

विसरा सवंग मोठेपण, विसरून जा हे थाट,

शब्दांच्या सत्याविना केवळ रद्दीचीच वाट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com