Lakshya Sen into The final of Canada Open Super 500: भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनसाठी शनिवार खास ठरला. त्याने कॅनडा ओपन सुपर 500 स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्याने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या केंटा निशीमोटोला सरळ सेटमध्ये पराभूत केले.
राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या सेनची कामगिरी केल्या काही महिन्यात ढासळली होती. पण नंतर त्याने दमदार पुनरागमन केले. त्याने थायलंड ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठली होती आणि आता त्याने कॅनडा ओपनमध्येही अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या वर्षातील हा त्याचा पहिलाच अंतिम सामना आहे.
सेनने निशीमोटोला कॅनडा ओपनच्या उपांत्य फेरीत 21-17 21-14 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले.
या सामन्यात निशिमोटोने पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात केली होती. पहिल्या सेटच्या ब्रेकपर्यंत त्याने 11-10 अशी आघाडीही मिळवली होती. पण नंतर सेनने स्मॅश आणि त्याच्या शानदार रिटर्नचे फटके खेळत पुनरागमन केले. त्यामुळे त्याने पहिला सेट जिंकत आघाडी मिळवली.
दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये तगडी झुंज पाहायला मिळाली. 9-9 अशी बरोबरीही झाली होती. पण ब्रेकपर्यंत सेनने दोन गुणांची आघाडी घेतली. अखेरीस हा सेटही सेनने सहज जिंकला आणि सामनाही नावावर केले.
आता सेनचा अंतिम सामन्यात चीनच्या ली शी फेंगविरुद्ध लढत होणार आहे. आता रविवारी रात्री उशीरा हा अंतिम सामना पार पडेल. सेन आणि ली शी फेंग यांच्यात आत्तापर्यंत ६ सामने झाले असून 4 सेनने जिंकले आहेत, तर 2 फेंगने जिंकले आहेत. सेनने नुकतेच थायलंड ओपनमध्ये फेंगला पराभूत केले आहे.
मात्र, भारताची दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूला कॅनडा ओपनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरील जपानच्या एकाने यमागुचीने पराभूत केले. तिला यमागुचीने 14-21, 15-21 अशा फरकाने पराभूत केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.