Kieron Pollard: संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या इंटरनॅशलन लीग 2022-23 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शुक्रवारी अबुधाबी नाईट रायडर्स विरुद्ध एमआय एमिरेट्स संघात सामना झाला. या स्पर्धेत एमआय एमिरेट्सचा कर्णधार कायरन पोलार्डचा आक्रमक अंदाज पाहायला मिलाला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या एमिरेट्स संघाकडून पोलार्ड फलंदाजी करत असताना 17 व्या षटकात नाईट रायडर्सचा गोलंदाज आंद्रे रसल आला. त्याने टाकलेल्या या षटकात पोलार्डचे तब्बल 26 धावा चोपल्या.
पोलार्डने रसेलविरुद्ध या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर चौकार ठोकला. त्यांनंतर त्याने दुहेरी धावा घेतल्या. पोलार्डने चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर चौकार आणि अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यामुळे या पूर्ण षटकात एकूण 26 धावा निघाल्या. पोलार्डने केलेल्या या आक्रमक खेळीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, पोलार्डच्या या आक्रमणामुळे एमिरेट्स 20 षटकात 4 बाद 180 धावांपर्यंत पोहचू शकला. पोलार्डने 17 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 43 धावा केल्या. पोलार्डव्यतिरिक्त एमिरेट्सकडून मुहम्मद वसिमनेही चांगला खेळ करताना 43 चेंडूत 60 धावांची खेळी केली होती. तसेच लॉर्कन टकर आणि आंद्र फ्लेचर यांनीही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या.
नाईट रायडर्सकडून सुनील नारायण, सबीर अली आणि मर्चंड दे लाँग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
एमिरेट्सने दिलेल्या 181 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाईट रायडर्सचा संघ 19.2 षटकात 162 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे एमिरेट्सने हा सामना 18 धावांनी सहज जिंकला.
दरम्यान, फलंदाजीत रसेलने चांगली कामगिरी करताना 42 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त नाईट रायडर्सकडून जो क्लार्कलाच 20 धावांचा टप्पा पार करता आला. त्याने 22 धावांची खेळी केली.
एमिरेट्सकडून ड्वेन ब्रावोने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच इम्रान ताहीर आणि झहुर खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर ट्रेंट बोल्ट, फझलहक फारुकी आणि डॅन मुसली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्त्वाचे असे की या विजयासह एमिरेट्स स्पर्धेतील प्लेऑफ फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त डेझर्ट वायपर्स आणि गल्फ जायंट्स देखील प्लेऑफसाठी पात्र ठरले असून आता प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ शारशाह वॉरियर्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यातील सामन्यानंतर निश्चित होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.