Ranji Cricket: कर्नाटकच्या फलंदाजांनी अपेक्षेनुसार रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. सलामीच्या रवीकुमार समर्थ याने मोसमातील सलग तिसरे शतक ठोकले, कर्णधार मयांक अगरवाल आणि 19 वर्षीय विशाल ओनाट यांनी अर्धशतके नोंदविली.
दरम्यान, पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर मंगळवारपासून सुरू झालेल्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर कर्नाटकने (Karnataka) 3 बाद 294 धावा केल्या. सामन्याच्या अखेरच्या सत्रात दोन गडी झटपट बाद केल्याचे समान गोव्याला लाभले.
तसेच, सेनादलाविरुद्ध नाबाद 119, तर पुदुचेरीविरुद्ध 137 धावा केलेल्या समर्थने 140 धावांची शैलीदार खेळी केली. अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) गोलंदाजीवर यष्टिरक्षक एकनाथ केरकर याच्या हाती झेल देण्यापूर्वी या 29 वर्षीय फलंदाजाने 140 धावा केल्या. त्याने 238 चेंडूंतील खेळीत 14 चौकार मारले. दिवसअखेर विशाल 73, तर मनीष पांडे 8 धावांवर खेळत होता. विशालने 172 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार मारले. गोव्याने संघात एक बदल करताना फिरकी गोलंदाज शुभम देसाई याच्याजागी मध्यमगती फेलिक्स आलेमावला संधी दिली.
नाणेफेक जिंकून कर्नाटकने प्रथम फलंदाजी स्वीकारली. समर्थ व मयांक यांनी चौफेर फटकेबाजी करत उपाहारापूर्वीच संघाच्या धावफलकावर शतकी धावसंख्या लावली. उपाहारापूर्वीच्या शेवटच्या षटकात मयांकला लक्षय गर्गने पायचीत केले. त्यामुळे 116 धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्यापूर्वी मयांक 42 धावांवर असताना लक्षयने त्याला त्रिफळाचीत बाद केले होते, पण व्हिडिओ तपासणीनंतर तो नोबॉल ठरला. मयांकने 82 चेंडूंत 50 धावा करताना पाच चौकार व दोन षटकार मारले. नंतर समर्थ व विशाल यांनी सहजसुंदर फलंदाजी केली. त्यामुळे चहापानाच्या ठोक्याला कर्नाटकला 1 बाद 220 अशी मजबूत धावसंख्या उभारता आली. दिवसातील शेवटची 15 षटके बाकी असताना समर्थ बाद झाल्यामुळे दुसऱ्या विकेटची 143 धावांची भागीदारी भंग झाली. अखेरची चार षटके बाकी असताना दर्शन मिसाळने निकिन जोस याला पायचीत बाद केले.
कर्नाटक, पहिला डाव ः 90 षटकांत 3 बाद 294 (रवीकुमार समर्थ 140, मयांक अगरवाल 50, विशाल ओनाट नाबाद 73, एस. जे. निकिन जोस 9, मनीष पांडे नाबाद 8, लक्षय गर्ग 15-1-48-1, अर्जुन तेंडुलकर 13-2-30-1, फेलिक्स आलेमाव 12-0-55-0, दर्शन मिसाळ 32-4-73-1, मोहित रेडकर 14-0-55-0, सिद्धेश लाड 1-0-8-0, सुयश प्रभुदेसाई 3-0-16-0).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.