पणजी : चिराग जानी याचे शतक, तसेच शतकाच्या वाटेवर असलेला शेल्डन जॅक्सन यांच्या प्रभावी फलंदाजीच्या बळावर रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गतविजेत्या सौराष्ट्रने सुस्थिती गाठली. गोव्याविरुद्धच्या एलिट ड गट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गुरुवारी त्यांनी ७ बाद ३४३ धावा केल्या. सामना मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी (Narendra Modi) क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. (Saurashtra scored 343 runs for the loss of 7 wickets At the end of the first day)
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सहावे शतक केलेल्या ३२ वर्षीय चिराग याने १४० धावा केल्या. त्याने १९० धावांच्या खेळीत २२ चौकार व २ षटकार मारले. चिरागने जॅक्सन याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. नंतर सौराष्ट्रने (Saurashtra) तीनशे धावा होण्यापूर्वी सात विकेट गमावल्या, पण दिवसअखेर जॅक्सनने धर्मेंद्रसिंह जडेजा याच्यासमवेत आठव्या विकेटसाठी ४० धावांची अभेद्य भागीदारी करून संघाचा डाव लांबविला. ३५ वर्षीय जॅक्सन प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विसाव्या शतकापासून चार धावा दूर आहे. त्याने ११९ चेंडूंतील आक्रमक खेळीत सहा चौकार व पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ९६ धावा केल्या आहेत, तर जडेजा २३ धावांवर खेळत आहे.
चिरागची शानदार फलंदाजी
ओडिशाविरुद्ध मागील लढतीत द्विशतकी (२३५) खेळी केलेल्या चिरागने गुरुवारी तोच फॉर्म कायम राखला. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा सौराष्ट्रचा निर्णय सार्थ ठरला. स्नेल पटेल याला श्रीकांत वाघ याने शून्यावर पायचीत केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील चिरागने हार्विक देसाई याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. नंतर तिसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्यासह ५३ धावांची भर टाकली. मात्र भारतीय कसोटी संघातील स्थान गमावलेल्या पुजारा याला सूर गवसला नाही. वैयक्तिक २८ धावांवर त्याला सुयश प्रभुदेसाईने पायचीत बाद केले. नंतर चिरागने जॅक्सनसह दमदार फलंदाजी करत गोव्याच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. सुयशनेच अमोघ देसाईकरवी चिरागला झेलबाद करून गोव्यासमोरील मोठा अडसर दूर केला.
संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र, पहिला डाव : ८५ षटकांत ७ बाद ३४३ (हार्विक देसाई १४, स्नेल पटेल ०, चिराग जानी १४०, चेतेश्वर पुजारा २८, शेल्डन जॅक्सन नाबाद ९६, अर्पित वसवदा १२, प्रेरक मांकड २८, पार्थ भूत ०, धर्मेंद्रसिंह जडेजा नाबाद २३, लक्षय गर्ग १९-४-७४-२, श्रीकांत वाघ ७-२-३४-१, शुभम रांजणे १४-४-३०-१, अमित यादव १४-०-७२-०, सुयश प्रभुदेसाई ९-२-३६-२, दर्शन मिसाळ १६-२-६९-१, मलिकसाब सिरूर ६-०-२८-०)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.