

Jasprit Bumrah 150 ODI Wickets Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे सामन्यांच्या मालिकेला थरारक सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीला जोरदार हल्ला चढवला. बेन डकेट आणि जेकब बेथल यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची उत्कृष्ट भागीदारी रचत इंग्लंडला मजबूत सुरुवात करुन दिली. मात्र, 13व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या भारताच्या गुरनूर बरारने एकाच षटकात या दोन्ही सलामीवीरांना बाद करुन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि भारताचे सामन्यात पुनरागमन करुन दिले.
या धक्क्यातून इंग्लंड सावरण्यापूर्वीच, पुढच्याच षटकात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला आऊट करुन भारताला तिसरे मोठे यश मिळवून दिले.
बुमराहने अत्यंत अचूक आणि भेदक चेंडूवर हॅरी ब्रूकला आऊट केले. बुमराहचा एक उसळी घेणारा बॅक ऑफ लेंथ चेंडू पडल्यानंतर थेट रेषेत आला, ज्यावर ब्रूकने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडूला मिळालेल्या अतिरिक्त उसळीमुळे तो थेट स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात विसावला. या विकेटसह हॅरी ब्रूक हा जसप्रीत बुमराहचा वनडे क्रिकेटमधील 150 वा बळी ठरला.
या शानदार विकेटसोबतच बुमराहने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये 150 विकेट्स पूर्ण करणारा तिसरा भारतीय गोलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला. त्याने अवघ्या 4605 चेंडूंमध्ये ही किमया साधली. या यादीत भारतासाठी सर्वात कमी (4070) चेंडूंमध्ये 150 विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे, तर कुलदीप यादव (4513 चेंडू) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हॅरी ब्रूकला बाद करताच बुमराहने आणखी एक मोठा मैलाचा दगड पार केला. तो आता इंग्लंडच्या भूमीवर वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. या बाबतीत त्याने भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा विक्रम मोडीत काढला. जडेजाने इंग्लंडमध्ये 30 वनडे बळी घेतले होते, तर आता बुमराहच्या खात्यात 31 बळी झाले. या यादीत भुवनेश्वर कुमार 28 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही तीन सामन्यांची वनडे मालिका पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा प्रयत्न टी-20 मालिकेत मिळालेल्या 4-0 अशा मानहानिकारक पराभवाचा बदला घेण्याचा असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.