पणजी: माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सोमवारी जबरदस्त विजयी मुसंडी मारली. एका गोलच्या पिछाडीवरून त्यांनी एटीके मोहन बागानला 2-1 फरकाने पराभवाचा धक्का दिला.
(ISL football Match Chennaiyin Football Club win)
कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर झालेल्या सामन्यात मनवीर सिंग याने 26 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे एटीके मोहन बागान संघ पूर्वार्धात एका गोलने आघाडीवर होता. नंतरच्या 45 मिनिटांच्या खेळात चेन्नईयीन एफसीने जोरदार खेळ केला. उत्तरार्धात क्वामे कारीकारी बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरल्यानंतर दोन वेळच्या माजी विजेत्यांचा खेळ आक्रमक झाला.
गोलरक्षक विशाल कैथ याची चूक एटीके मोहन बागानला महागात पडली. त्याने घानाचा आघाडीपटू क्वामे कारीकारी याला अडथळा आणला. 63 व्या मिनिटास स्वतः कारीकारी याने पेनल्टी फटका अचूकपणे मारत थॉमस ब्रडारिच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला बरोबरी साधून दिली.
आयएसएल स्पर्धा इतिहासातील चेन्नईयीनचा हा दोनशेवा गोल ठरला. सामन्याच्या 82 व्या मिनिटास 22 वर्षीय आघाडीपटू रहिम अली याने बरोबरीची कोंडी फोडली. क्वामे कारीकारी याच्या असिस्टवर रहीमने गोलरक्षक कैथला चकवा देत चेन्नईयीनला 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली, जी अखेरीस निर्णायक ठरली.
जमशेदपूर-ओडिशा लढत आज
आयएसएल स्पर्धेत मंगळवारी (ता. 11) गतमोसमातील लीग विनर्स जमशेदपूर एफसी व ओडिशा एफसी यांच्यात सामना होणार आहे. लढत जमशेदपूर येथील जेआरडी टाटा स्पोर्टस कॉम्प्लेक्स मैदानावर खेळला जाईल. जमशेदपूर एफसीने गतमोसमात साखळी फेरीत अव्वल स्थान मिळवत शिल्ड पटकावली होती.
ओडिशा एफसीला गतमोसमात सूर गवसला नव्हता, त्यांची सातव्या स्थानी घसरण झाली होती. उभय संघात आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. जमशेदपूरने चार वेळा विजय नोंदविला असून ओडिशाला एकच लढत जिंकता आली. एक सामना बरोबरीत राहिला. गतमोसमातील दोन्ही लढतीत जमशेदपूरने बाजी मारली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.