

Aymen Hussein Iraq Football Star Struggle Story: फुटबॉलच्या मैदानावर एखादा खेळाडू जेव्हा स्टार बनतो, तेव्हा जग फक्त त्याचे यश आणि ग्लॅमर पाहते. परंतु, त्या यशाच्या मागे किती वेदनादायी आणि खडतर संघर्ष दडलेला असतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे इराकचा 30 वर्षीय स्टार स्ट्रायकर अमीन हुसेन. आज अमीन केवळ इराकचा सर्वात मोठा फुटबॉलपटू नाही, तर चालू फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये इराकसाठी ऐतिहासिक गोल करणारा महानायक बनला. मात्र, त्याचा हा सुवर्णप्रवास अत्यंत वेदनादायक आणि काट्यांनी भरलेल्या रस्त्यावरुन झाला.
अमीन अवघा 12 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांची अल-कायदा या दहशतवादी संघटनेने निर्घृण हत्या केली. दुःखाचा हा डोंगर कोसळल्यानंतर 2024 मध्ये त्याच्या भावाचे 'इसिस' (ISIS) या दुसऱ्या एका क्रूर दहशतवादी संघटनेने अपहरण केले, ज्याचा माग आजतागायत लागलेला नाही. कुटुंब उद्ध्वस्त झालेले असताना आणि डोक्यावर सतत मृत्यूचे सावट असताना अमीनने फुटबॉल खेळणे सुरुच ठेवले.
इराकचे (Iraq) महान फुटबॉलपटू युनिस मोहम्मद यांनी निवृत्ती घेतल्यानंतर अमीन हुसेनला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले खरे, पण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात त्याच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खराब कामगिरीमुळे लोकांनी आणि चाहत्यांनी त्याचा जाहीरपणे अपमान व टवाळी करण्यास सुरुवात केली. या टीका आणि मानसिक त्रासाला कंटाळून अमीनने अखेर फुटबॉलला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. मात्र, अशा कठीण प्रसंगात त्याच्या आईने त्याच्या पाठीशी ढाल म्हणून उभे राहण्याचे ठरवले.
आईने दिलेला धीर आणि 'हार मानू नकोस' हा कानमंत्र अमीनच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. आईच्या प्रेरणेमुळे त्याने मैदानात पुन्हा पुनरागमन केले आणि त्यानंतर जो इतिहास घडला तो थक्क करणारा आहे.
अमीनने अवघ्या 20 व्या वर्षी इराकच्या संघाला एका मोठ्या स्पर्धेच्या फायनलचे तिकीट मिळवून दिले. आज तब्बल 40 वर्षांनंतर इराकचा संघ जर लागोपाठ फिफा वर्ल्ड कप खेळत असेल, तर त्याचे संपूर्ण श्रेय अमीनच्या अथक परिश्रमांना जाते. चालू विश्वचषकासाठी जेव्हा तो अमेरिकेत पोहोचला, तेव्हा त्याच्या इराकी नागरिकत्वामुळे आणि पार्श्वभूमीमुळे विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी त्याची तब्बल 7 तास कडक चौकशी केली.
या मानसिक त्रासानंतरही त्याचा आत्मविश्वास डगमगला नाही. त्याने मैदानावर उतरुन नॉर्वेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात इराकसाठी पहिला आणि ऐतिहासिक गोल डागला. जर त्याच्या आईने त्याला त्या कठीण काळात धीर दिला नसता, तर आज जगाला अमीन हुसेनसारखा जिद्दी आणि महान फुटबॉल स्टार मिळाला नसता, हेच खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.