

Finn Allen Century vs Delhi Capitals: आयपीएल 2026 च्या 51व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फिन ॲलन याच्या बॅटीने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडला. शुक्रवारी (8 मे 2026) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात ॲलनने आपल्या विस्फोटक खेळीने कोलकाता नाईट रायडर्सला केवळ दणदणीत विजयच मिळवून दिला नाही, तर संघाच्या इतिहासातील सर्वात घातक फलंदाजांच्या पंक्तीत स्वतःचे नाव कोरले.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 142 धावांचे माफक आव्हान उभे केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात थोडी डळमळीत झाली असली तरी, फिन ॲलनने एकट्याने सामन्याचा चेहरामोहरचा बदलून टाकला.
फिन ॲलनने सलामीला येत केवळ 47 चेंडूंमध्ये नाबाद 100 धावांची खेळी खेळली. त्याच्या या शतकी खेळीत चौकारांपेक्षा षटकारांचीच जास्त चर्चा रंगली. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीदरम्यान तब्बल 10 उत्तुंग षटकार लगावले. या कामगिरीसह तो कोलकाता नाईट रायडर्ससाठी एकाच डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या विशेष यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला. या यादीत अव्वल स्थानी ब्रेंडन मॅक्युलम असून त्याने 2008 मध्ये आरसीबी विरुद्ध 13 षटकार मारले होते, तर दुसऱ्या स्थानी आंद्रे रसेल आहे, ज्याने 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 11 षटकार ठोकले होते. ॲलनच्या या शतकामुळे केकेआरच्या प्ले-ऑफच्या आशा आता पुन्हा एकदा जिवंत झाल्या.
कोलकाता नाईट रायडर्सचा पुढचा सामना 13 मे रोजी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध होणार आहे. तीन वेळचा चॅम्पियन राहिलेला कोलकाता संघ आरसीबीला पराभूत करुन गुणतालिकेत मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करेल. सध्या कोलकाता संघाच्या खात्यात 10 सामन्यांनंतर 9 गुण जमा आहेत. फिन ॲलनचा सध्याचा फॉर्म पाहता आगामी सामन्यांमध्येही केकेआरकडून (KKR) अशाच प्रकारच्या स्फोटक कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.