

आयपीएल २०२६ चा हंगाम सध्या शिगेला पोहोचला असतानाच, या स्पर्धेला पुन्हा एकदा 'फिक्सिंग'च्या काळ्या सावटाने घेरले आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा युनिटला (ACSU) काही धक्कादायक बाबी आढळल्या असून त्यांनी यासंदर्भात एक 'सीक्रेट रिपोर्ट' बोर्डाला सादर केला आहे. या अहवालातील दाव्यांमुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली असून, स्पर्धेची पारदर्शकता टिकवण्यासाठी बीसीसीआय आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, "ACSU ने सादर केलेल्या अहवालात खेळाडूंच्या डगआउट, टीम बस आणि टीम हॉटेलसारख्या अतिसुरक्षित ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींचा वावर असल्याचे समोर आले आहे." नियमांनुसार या ठिकाणी केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश असतो. मात्र, या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले असून, बीसीसीआयने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आहे.
अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काही खेळाडूंसोबत अनेकदा अज्ञात महिला दिसून येत आहेत. फिक्सिंगच्या जाळ्यात ओढण्यासाठी खेळाडूंना 'बळीचा बकरा' बनवले जात असल्याची शक्यता ACSU ने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, खेळाडूंच्या मैत्रिणींच्या (Girlfriends) भेटीगाठींबाबतचे नियम आता अधिक कडक केले जाऊ शकतात. खेळाडूंना अशा लोकांपासून दूर ठेवण्यासाठी बीसीसीआय लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार आहे.
केवळ खेळाडूच नाही, तर काही संघांचे मालक आणि अधिकारीही नियमांचे उल्लंघन करताना आढळले आहेत. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी 'एएनआय'शी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "आम्ही पाहिले आहे की काही फ्रँचायझी मालक आणि अधिकारी अशा ठिकाणी खेळाडूंशी चर्चा करत आहेत जिथे त्यांना परवानगी नाही. नियमांचे पालन सर्वांनाच बंधनकारक आहे, पण सध्या यात मोठी ढिलाई दिसून येत आहे."
बीसीसीआय लवकरच सर्व १० संघांसाठी नवीन 'अॅडव्हायझरी' जारी करणार आहे. यानंतरही जर कोणत्याही संघाने किंवा खेळाडूने नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर आयपीएल समितीकडून कठोर कारवाई केली जाईल. फिक्सिंगचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हॉटेल आणि डगआउट परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.