

क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग, म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) च्या १९ व्या हंगामाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, यंदा या स्पर्धेच्या सुरुवातीच्या तारखेत काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएल २०२६ चा धमाका २६ मार्च ऐवजी २८ मार्च पासून सुरू होऊ शकतो.
बीसीसीआयने यापूर्वी लिलावाच्या वेळी सर्व फ्रँचायझींना आयपीएल सामन्यांसाठी २६ मार्च ही संभाव्य तारीख कळवली होती. परंतु, आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, स्पर्धेच्या सुरुवातीला दोन दिवसांचा उशीर होऊ शकतो. २८ मार्च (शनिवार) किंवा २९ मार्च (रविवार) यापैकी एका तारखेवर बीसीसीआय शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. दरम्यान, तारखांमध्ये बदल झाला तरी स्पर्धेचा अंतिम सामना मात्र ३१ मे रोजीच खेळवला जाईल, असे संकेत मिळत आहेत.
या वर्षी तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या राज्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सारख्या दिग्गज संघांची घरची मैदाने आहेत. निवडणूक आयोगाच्या तारखा अजून स्पष्ट नसल्याने, सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन बीसीसीआय वेळापत्रकाचे दोन भाग करू शकते. पहिल्या काही सामन्यांचे वेळापत्रक मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून, उर्वरित वेळापत्रक निवडणुकीच्या तारखांनुसार निश्चित केले जाईल.
यंदाचा सलामीचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या मैदानावर होणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या वर्षी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर जेतेपदाच्या जल्लोषादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे मैदानाबाबत अजूनही पेच कायम आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने सुरक्षेचे नवीन नियम लागू केले असले, तरी आरसीबीने पर्यायी व्यवस्था म्हणून पुणे, नवी मुंबई किंवा रायपूर या शहरांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.