

IPL 2026 Points Table Latest: आयपीएल 2026 चा हंगाम आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला असून प्रत्येक सामन्यागणिक गुणतालिकेतील समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील लढतीने केवळ या दोन संघांच्याच नाही, तर इतर संघांच्याही स्थानावर मोठा परिणाम केला. राजस्थान रॉयल्सने लखनऊवर विजय मिळवत गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकून राजस्थानच्या खात्यात आता 10 गुण जमा झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात सलग दोन पराभवांचा सामना करावा लागल्यानंतर रियान परागच्या संघाने पुन्हा एकदा विजयी लय प्राप्त केली.
राजस्थानच्या या विजयाचा फटका रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांना बसला. या विजयापूर्वी हे दोन्ही संघ वरच्या स्थानांवर होते, मात्र राजस्थानने बाजी मारल्यामुळे त्यांना प्रत्येकी एक स्थान खाली सरकावे लागले. सध्या आरसीबी आणि हैदराबाद या दोन्ही संघांकडे प्रत्येकी 8 गुण आहेत, मात्र नेट रनरेटच्या जोरावर आरसीबी तिसऱ्या तर हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे.
दिल्ली कॅपिटल्स 6 गुणांसह पाचव्या आणि गुजरात टायटन्स तितक्याच गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सचा जलवा मात्र अद्याप कायम आहे. 6 सामन्यांत 11 गुणांसह पंजाब गुणतालिकेत अव्वल स्थानी असून या हंगामात आतापर्यंत एकही सामना न हारलेला तो एकमेव संघ ठरला.
गुणतालिकेच्या तळाला असलेल्या संघांची अवस्था सध्या अत्यंत बिकट दिसत आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनऊ सुपर जायंट्स या तीन बलाढ्य संघांच्या खात्यात केवळ चार-चार गुण आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अवघ्या 3 गुणांसह दहाव्या क्रमांकावर संघर्ष करत आहे. अशा स्थितीत आज आयपीएलमधील सर्वात मोठी 'एल-क्लासिको' लढत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.
पाचवेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. जो संघ जिंकेल तो 6 गुणांसह प्ले-ऑफच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवेल, तर हरणाऱ्या संघासाठी इथून पुढचा प्रवास अत्यंत खडतर होणार आहे. क्रिकेट चाहत्यांचे डोळे आजच्या या महामुकाबल्याकडे लागले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.