

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) १४ व्या हंगामाचा रोमांच सध्या शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही फलंदाज सपाट खेळपट्ट्यांचा फायदा घेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. क्रिकेटच्या या खेळात अनेकदा फलंदाज गोलंदाजांवर पूर्णपणे भारी पडताना दिसतात. अशा परिस्थितीत फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये खेळाचा योग्य समतोल राखण्यासाठी आणि आयपीएलला आणखी रंजक बनवण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी बीसीसीआयला (BCCI) तीन अतिशय अनोखे आणि क्रांतिकारी नियम बदलण्याचे सल्ले दिले आहेत. जर हे नियम लागू झाले, तर क्रिकेटच्या इतिहासात मोठा बदल घडून येईल.
टी-२० क्रिकेटच्या सध्याच्या नियमांनुसार, कोणत्याही एका गोलंदाजाला सामन्यात कमाल ४ ओव्हर्स (२४ चेंडू) टाकण्याची परवानगी असते. मात्र, आकाश चोप्रा यांनी गोलंदाजांच्या फायद्यासाठी एक गजब नियम सुचवला आहे. त्यांच्या मते, जर एखाद्या गोलंदाजाने सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत ३ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स (बळी) घेतल्या, तर त्याला बक्षीस म्हणून एक एक्स्ट्रा ओव्हर म्हणजेच पाचवी ओव्हर टाकण्याची परवानगी दिली पाहिजे. यामुळे चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजाचा संघ अधिक आक्रमकपणे वापर करू शकेल.
सध्या आयपीएलच्या लीग स्टेजमध्ये सामना जिंकणाऱ्या संघाला २ पॉईंट्स मिळतात. आकाश चोप्रा यांनी येथे 'बोनस पॉईंट'ची संकल्पना मांडली आहे. त्यांच्या मते, जर एखाद्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या १५-१६ ओव्हर्समध्येच विजय मिळवला, किंवा धावांचा बचाव करताना समोरील संघावर ४० किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी मोठा विजय मिळवला, तर अशा संघाला २ ऐवजी थेट ३ पॉईंट्स दिले पाहिजेत. यामुळे नेट रनरेटसोबतच गुणतालिकेतील चुरस अधिक वाढेल.
सध्या चेंडू सीमारेषेबाहेर कितीही लांब गेला तरी फलंदाजाला ६ धावाच मिळतात. मात्र, आकाश चोप्रा यांच्या तिसऱ्या सल्ल्यानुसार, जर एखाद्या फलंदाजाने १०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लांबीचा उत्तुंग षटकार मारला, तर त्याच्या संघाला ६ ऐवजी थेट ८ धावा दिल्या पाहिजेत. आकाश यांच्या मते, ८ धावांच्या मोहापायी फलंदाज मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करतील, ज्यामध्ये त्यांची विकेट जाण्याचा धोकाही वाढेल. यामुळे सामन्यातील रोमांच कमालीचा वाढू शकतो. बीसीसीआय आगामी काळात या नियमांवर विचार करते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.