Yuzvendra Chahal and Joe Root Dance: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशातील खेळाडू भारतीय खेळाडूंबरोबर 10 वेगवेगळ्या संघांकडून एकत्र खेळताना दिसत आहेत. यामुळे मैदानाबाहेरही या खेळाडूंची मैत्री बहरते. त्यामुळे त्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ आयपीएलदरम्यान व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे, ज्यात राजस्थान रॉयल्सचे सदस्य असलेले युजवेंद्र चहल आणि जो रूट हे दोन खेळाडू डान्स करताना दिसत आहेत. चहल हा नेहमीच मैदानातील कामगिरीव्यतिरिक्त त्याच्या मैदानाबाहेरील मस्तीमुळे चर्चेत असतो. तर इंग्लंडचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रुट पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी झाला असून आयपीएलमधील वातावरणाचा आनंद घेत आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की रुट आणि चहल एका स्टेजवर असून 'भरोसा तेरे प्यार मै' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की 'रुट तुझे आयपीएलमध्ये युझी स्टाईलमध्ये स्वागत.'
हा व्हिडिओ क्रिकेट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून मोठ्या प्रमाणात लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सने अनेक गमतीशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
जो रुटला राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2023 लिलावादरम्यान 1 कोटीच्या मुळ किमतीत खरेदी केले होते. पण अद्याप रुटला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
पण राजस्थानकडून या आयपीएलच्या 16 व्या हंगामातील दुसरा सामना खेळताना जोस बटलरच्या बोटाला दुखापत झाली आहे. तो पुढील दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 8 एप्रिलला होणाऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आले. त्यामुळे त्याच्याजागेवर रुटला खेळण्याची संधी मिळू शकते. असे झाल्यास रुटचे आयपीएलमध्ये पदार्पणही होईल.
तसेच चहलबद्दल सांगायचे झाल्यास तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून नुकताच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. त्याने आयपीएलमध्ये 133 सामने खेळताना आत्तापर्यंत 171 विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.