Mumbai Indians vs Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने 13 धावांनी विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सचा हा या हंगामातील 6 सामन्यांमधील तिसरा पराभव आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईने सलग तीन सामने जिंकल्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच पंजाबचा हा 7 सामन्यांमधील चौथा विजय ठरला.
या सामन्यात पंजाबने मुंबईसमोर 215 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 6 बाद 201 धावा केल्या.
मुंबईकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन उतरले होते. पण ईशान दुसऱ्याच षटकात 1 धावेवर बाद झाला. पण त्यानंतर रोहितला कॅमेरॉन ग्रीनने चांगली साथ दिली होती. त्यांनी 76 धावांची भागीदारीही केली. पण त्यांची भागीदारी लियाम लिव्हिंगस्टोनने 10 व्या षटकात रोहितचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत तोडली. रोहित 44 धावा करून बाद झाला.
पण त्यानंतरही ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव पुढे नेत आक्रमक शॉट खेळले होते. त्यांनीही 75 धावांची भागीदारी करत मुंबईला विजयाच्या जवळ पोहचवले होते. पण मोक्याच्या क्षणी ग्रीनला नॅथन एलिसने 16 व्या षटकात बाद केले. ग्रीनने 43 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 67 धावांची खेळी केली. त्यानंतर 18 व्या षटकात सूर्यकुमार यादवही बाद झाला. सूर्यकुमारने 26 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावांची खेळी केली.
या सामन्यात अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सला 16 धावांची गरज होती. यावेळी पंजाबकडून अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर टिम डेव्हिडला एकच धाव घेता आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तिलक वर्मा धाव काढू शकला नाही. आणि तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलक वर्माला, तर चौथ्या चेंडूवर नेहल वढेराला त्रिफळाचीत केले.
विशेष म्हणजे या दोन्ही वेळेस स्टंप तुटले. सलग दोन चेंडूत दोन विकेट्स गेल्याने मुंबई इंडियन्स संकटात सापले. अखेरच्या दोन चेंडूतही अर्शदीपने 1 धावच दिली. त्यामुळे या षटकात दोन विकेट्स घेताना अर्शदीपने केवळ दोन धावा दिल्या.
पंजाबकडून या सामन्यात अर्शदीपने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तसेच नॅथन एलिस आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबकडून सलामीला मॅथ्यू शॉर्ट आणि प्रभसिमरन सिंगने चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. पण शॉर्टला तिसऱ्या षटकात कॅमेरॉन ग्रीनने 11 धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर अथर्व तायडे आणि प्रभसिमरन यांनी डाव सावरला.
मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरनला 26 धावांवर पायचीत पकडले. काहीवेळातच 10 व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोन 10 धावांवर पीयुष चावलाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. त्याच षटकात पीयुषने अथर्वला 29 धावांवर बाद केले.
पण नंतर कर्णधार सॅम करन आणि हरप्रीत सिंग भाटियाने आक्रमक खेळ केला. त्यांनी 92 धावांची भागीदारी 5 व्या विकेटसाठी केली. दरम्यान, त्यांनी अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजी केलेल्या 16 व्या षटकात तब्बल 31 धावा ठोकल्या. त्यानंतरही त्यांनी आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली होती. पण प्रभसिमरन 18 व्या षटकात 28 चेंडूत 41 धावा करून बाद झाला.
पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या जितेश शर्माने पहिल्या दोन चेंडूंवरच दोन षटकार मारत त्याचे इरादे स्पष्ट केले. पण 19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जोफ्रा आर्चरविरुद्ध खेळताना सॅम करन 29 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 55 धावा करून बाद झाला. मात्र जितेशने आक्रमक खेळ सुरू ठेवला होता.
अखेरच्या षटकात त्याला जेसन बेऱ्हेंडॉर्फने बाद केले. जितेशने 7 चेंडूत 4 षटकारांसह 25 धावा केल्या. तसेच अखेरच्या चेंडूवर हरप्रीत ब्रार 2 चेंडूत 5 धावा करून धावबाद झाला. त्यामुळे या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 214 धावा केल्या.
मुंबईकडून कॅमेरॉन ग्रीन आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्जुन तेंडुलकर, जेसन बेऱ्हेंडॉर्फ आणि अर्जुन तेंडुलकर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.