आयपीएल 2022 मध्ये जुन्या खेळाडूंबरोबर नवखे खेळाडूदेखील आपला जलवा दाखवू लागले आहेत. त्यामुळे भारतीय सेलेक्टर्संच्या चिंता वाढू लागल्या आहेत. त्याचाच थेट परिणाम रोहित शर्मावर (Rohit Sharma) देखील होत आहे. आजपासून 6 महिन्यांनी विश्वचषक होणार असून सेलेक्शनचा 'होमवर्क' आत्तापासूनच सुरु झाला आहे. आयपीएल (IPL 2022) च्या या हंगामापूर्वी सर्व काही सहज ठरवले जाईल असे वाटत होते. परंतु पहिले दोन आठवडे उलटून गेल्यानंतर चित्र पालटले आहे.
अलीकडच्या काळात बाद झालेले खेळाडू चकीत करणारी कामगिरी करत आहेत. ज्या खेळाडूंचे नाव विश्वचषकाच्या संभाव्य प्लेईंग इलेव्हनमध्ये दिसत नव्हते, तेच खेळाडू आता संघात स्थान मिळवण्यासाठी दावा करु लागले आहेत. दुसरीकडे, टीम इंडियामधील दिग्गज खेळाडू यावेळी आऊट ऑफ फॉर्ममध्ये दिसत आहेत. ज्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीसारखे (Virat Kohli) खेळाडू आहेत.
दरम्यान, तब्बल 6 महिन्यांनंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तोपर्यंत संघात मोठा बदल झालेला क्रिकेटप्रेमींना दिसून येईल. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करताना या सात खेळाडूंनी सेलेक्टर्सचे लक्ष वेधून घेतले असून ज्यामध्ये पृथ्वी शॉ, शुभमन गिल, उमेश यादव, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या आहेत. यामध्ये पांड्या आणि शमीसारखे खेळाडू संघात असणार आहेत. परंतु इतर पाच खेळाडूंनी सेलेक्टर्संना बूचकाळ्यात पाडले आहे. एकूणच भारतीय संघासाठी ही चांगली बाब आहे.
सात खेळाडूंनी भारतीय सेलेक्टर्संना चकित केलं
आधी त्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांनी भारतीय सेलेक्टर्संना चकीत केले ज्यामध्ये पहिले नाव पृथ्वी शॉ चे आहे. पृथ्वी शॉ ने आतापर्यंत भारतासाठी एकच टी-२० सामना खेळला आहे. परंतु या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 4 सामन्यात 160 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा 170.21 हा स्ट्राईक रेट सर्वात महत्त्वाचा आहे. शुभमन गिलने अद्याप भारताकडून टी20 मध्ये पदार्पण केलेले नाही. मात्र या मोसमात तो शानदार फलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत 3 सामन्यात 180 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 166.66 आहे.
दुसरीकडे, उमेश, कुलदीप आणि चहल गोलंदाजांमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहेत. या तिघांनाही अलीकडच्या काळात संघातून बाहेर पडावे लागले. आता या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हे तिघे टॉप-3 मध्ये आहेत. पहिल्या क्रमांकावर यजुवेंद्र चहल आहे, ज्याने 4 सामन्यात 6.50 च्या इकॉनॉमीने 11 विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवने 4 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.40 आहे. उमेश यादव शेवटचा T20 साममा 2019 मध्ये खेळला होता. पण या मोसमात तो 5 सामन्यात 10 बळी घेत दावाही मांडत आहे. त्याची इकॉनॉमी देखील 6.60 ची आहे.
दरम्यान, शमी जरी संघात राहत असला तरी त्याच्या स्ट्राईक रेटची चर्चा होत असते. या मोसमात आतापर्यंत त्याने 7.58 च्या इकॉनॉमीने 6 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या टी-20 विश्वचषकातही हार्दिक पांड्यावरुन बराच गदारोळ झाला होता. त्याच्या फिटनेसबाबत बराच गोंधळ होता. त्यावेळी त्याच्या बचावासाठी विराट कोहलीलाही यावे लागले होते. विशेष म्हणजे विराटने या मोसमात त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीसोबतच कर्णधारपदही प्रभावित केले आहे. त्याची फलंदाजीमध्ये सरासरी 30 आणि स्ट्राईक रेट 124.65 आहे. त्याच्या खात्यात 3 सामन्यात 91 धावा जमा आहेत. गोलंदाजीत त्याने 7.91 च्या इकॉनॉमीने 2 विकेट घेतल्या आहेत. आत्तापर्यंत खेळलेले सर्व 3 सामने जिंकून त्याने आपल्या कर्णधारपदाची चुणूक दाखवली आहे.
रोहित शर्मावर विजयाची जबाबदारी असेल
कर्णधार रोहित शर्माही या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे. भारतीय क्रिकेटमधील विराटच्या कर्णधारपदाचा काळ संपला आहे. रोहित शर्मा वेगळ्या अंदाजात विचार करतो. रोहित शर्माच्या खेळाडूंबाबतच्या आवडीनिवडीही वेगळ्या आहेत. अशा स्थितीत पुढील 6 महिन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडून विश्वचषकात प्रतिनिधित्वाची अपेक्षा असेल. 2007 पासून भारतीय संघ टी-20 विश्वचषकाची वाट पाहत आहे.
गेल्या वर्षी UAE मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या T20 विश्वचषकात भारताची शानदार कामगिरी करता आली नव्हती. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडिया अजूनही त्या पराभवातून सावरलेली दिसून येत नाही. आता भारताला T20 फॉरमॅटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. परंतु हे आव्हान सोपे असणार नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.