Sania Mirza: तब्बल 20 वर्षांच्या कारकिर्दिला अखेरचा अलविदा, MC Stan, युवीचीही कोर्टवर हजेरी; पाहा Video

रविवारी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने तिच्या कारकिर्दीची हैदराबादमध्ये अखेर केली. यावेळी एमसी स्टॅन, युवराज सिंगसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Sania Mirza Farewell
Sania Mirza Farewell Dainik Gomantak

Sania Mirza Last Match: भारताची टेनिल स्टार सानिया मिर्झाने रविवारी जवळपास दोन दशकांच्या तिच्या प्रोफेशनल कारकिर्दीला अलविदा म्हटले. तिने हैदराबादमधील लाल बहादूर स्टेडियममध्ये अखेरचे सामने खेळले.

तिने यापूर्वीच सांगितले होते की साधारण 20 वर्षांपूर्वी जिथून कारकिर्दीची सुरुवात झाली, तिथेच म्हणजे हैदराबादमध्ये कारकिर्दीचा निरोप घ्यायचा आहे. त्यामुळे ती रविवारी काही मैत्रीपूर्ण सामने खेळली आणि तिने कारकिर्दीची अखेर केली. या सामन्यांनंतर ती भावूक झाली होती.

सानियाच्या अखेरच्या मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये रोहन बोपन्ना, इव्हान डोडिग, कारा ब्लॅक, बेथनी मॅटेक-सँड्स आणि मॅरियन बार्टोली असे काही टेनिसपटूही खेळले. हे टेनिसपटू तिच्या कारकिर्दीत कधी ना कधी तिचे पार्टनर होते.

याशिवाय तिच्या या अखेरच्या सामन्यांवेळी बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन यानेही परफॉर्मन्स दिला. त्याचबरोबर या सामन्यांसाठी भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग देखील उपस्थित होता. इतकेच नाही तर अनेक सरकारी अधिकाऱ्यांनीही हजेरी लावली होती.

Sania Mirza Farewell
Sania Mirza घरच्या चाहत्यांसमोर करणार ऐतिहासिक कारकिर्दीला अखेरचा अलविदा, Video शेअर करत म्हणाली...

सानिया यावेळी भावूक होत म्हणाली, 'मी आज मला ज्यांनी सेंड-ऑफ दिला, त्या सर्वांचेच आभार. मी यापेक्षा चांगली शेवटाची अपेक्षा करू शकत नव्हते. 2002 मध्ये कारकिर्दीची सुरुवात झाली, जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धेत मेडल जिंकले होते. त्यानंतर मी दुहेरीत पहिले डब्ल्यूटीएचे विजेतेपद जिंकले. 20 वर्षे देशाचे उच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणे ही सन्मानाची गोष्ट आहे.'

एका लहान मुलाने विशेषत: मुलीने टेनिस खेळण्याचा निर्णय घेतल्यावर अनेक जण अविश्वास दाखवतात, म्हणूनच हे कठीण होते. पण माझ्या पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ते माझ्या संपूर्ण प्रवासात माझ्या बरोबर होते.'

'मी या खेळाला नक्कीच मिस करेल. पण मी हे नक्की सांगते की मी तेलंगणा सरकारबरोबर आणि क्रीडा प्राधिकरणाबरोबर पुढील सानिया निर्माण करण्यासाठी नेहमी असेल. खरंतर आपल्याला अजून अनेक सानिया हव्या आहेत आणि आपण त्यासाठी नक्की काम करू. माझ्या डोळ्यातून येणारे हे आनंदाश्रू आहेत. मी तुम्हा सर्वांना मिस करेल.'

Sania Mirza Farewell
Sania Mirza: 'सर्व महिलांसाठी तू...', घटस्फोटांच्या चर्चांदरम्यानच सानियासाठी पती शोएबची इमोशनल पोस्ट

सानियाने यापूर्वीच तिच्या आंतरराष्ट्रीय टेनिस कारकिर्दीचा फेब्रुवारी 2023 मध्येच निरोप घेतला आहे. तिने तिचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना डब्लूटीए दुबई ड्यूटी फ्री चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळला होता.

पण तिला या स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीजबरोबर खेळताना पराभव स्विकारावा लागला होता. तसेच सानियाने जानेवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरी प्रकारात रोहन बोपन्नाबरोबर अंतिम सामना खेळला होता. हा तिचा अखेरचा ग्रँडस्लॅम सामना ठरला होता.

सानियाने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत 6 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने मिश्र दुहेरीत 2009 साली ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 साली फ्रेंच ओपन आणि 2014 साली अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याचबरोबर तिने महिला दुहेरीत 2015 साली विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धा, तसेच 2016 साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com