Sania Mirza Last Match: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिसला अलविदा केले आहे. पण आता ती तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना हैदराबादमधील एलबी टेनिस स्टेडियममध्ये खेळणार आहे. या सामन्यांसह ती तिच्या प्रोफेशनल कारकिर्दीची अखेर करणार आहे. याबद्दल तिने इंस्टाग्रामवरून घोषणा केली आहे.
तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की 'मी जिथून 18-20 वर्षांपूर्वी सुरुवात केली, तिथे 5 मार्च रोजी माझा सर्वात शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. यावेळी माझे सर्व जवळच मित्र, माझे कुटुंब, माझा पार्टनर सर्व येणार आहेत. तुमच्या सर्वांसमोर शेवटचे खेळण्यास मी उत्सुक आहे.'
तसेच ती म्हणाली, 'मला आशा आहे की माझ्या मित्रपरिवार, कुटुंबासमोर आणि महत्त्वाचे म्हणजे माझ्या प्रामाणिक चाहत्यांसमोर हा प्रवास एका चांगल्या प्रकारे संपेल.'
एलबी टेनिस स्टेडियममध्ये सानिया दोन सामने खेळणार असून हे दोन्ही सामने प्रदर्शनीय सामने असणार आहेत. यावेळी पहिल्यांदा दोन संघात सामने होणार आहेत. यामध्ये सानियाचा एक संघ असेल आणि दुसरा संघ रोहन बोपन्नाचा असेल.
तसेच सानिया रोहन बोपन्नासह इवान डोडिग व बेथानी मॅटेक-सँड्स या जोडीविरुद्ध मिश्र दुहेरीचा सामना खेळणार आहे. या सामन्यांसाठी 499 ते 749 रुपयांपर्यंत तिकिटे उपलब्ध आहेत.
सानियाने तिची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फेब्रुवारी 2023 मध्येच संपवली आहे. तिने अखेरचा सामना डब्लूटीए दुबई ड्यूटी फ्री चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळला. पण तिला या स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव स्विकारावा लागला.
ती या स्पर्धेत अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीजबरोबर खेळली होती. त्यांच्या जोडीला रशियाच्या वेरोनिका कुडरमेटोवा आणि ल्युडमिला सॅमसोनोव्हा या जोडीकडून 4-6, 0-6 असा पराभव पत्करावा लागला होता.
दरम्यान, सानियाने तिच्या संपूर्ण टेनिस कारकिर्दीत आत्तापर्यंत 6 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने मिश्र दुहेरीत 2009 साली ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 साली फ्रेंच ओपन आणि 2014 साली अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याचबरोबर तिने महिला दुहेरीत 2015 साली विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धा, तसेच 2016 साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.
तिने जानेवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरी प्रकारात अंतिम सामना खेळला होता. हा तिचा अखेरचा ग्रँडस्लॅम सामना ठरला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.