India vs New Zealand, 2nd ODI: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध रायपूरला झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 109 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 20.1 षटकात 2 विकेट्स गमावत 111 धावा करत विजय निश्चित केला.
भारताकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल मैदानात उतरला होता. या दोघांनीही भारताला चांगली सुरुवात देत विजयाचा मार्ग सुकर केला. रोहित आणि शुभमनने सलामीला 72 धावांची भागीदारी केली.
या भागीदारीदरम्यान रोहितने अर्धशतकही पूर्ण केले. त्याने 50 चेंडूत ५१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर शुभमनला साथ देण्यासाठी विराट कोहली मैदानात आला.
त्यांची भागीदारीही रंगत होती, पण मिशेल सँटेनरने विराटला 11 धावांवर बाद केले. पण तोपर्यंत भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला होता. अखेर भारताकडून शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी भारताच्या विजयावर 21 व्या षटकात शिक्कामोर्तब केले. शुभमन 40 धावांवर नाबाद राहिला आणि ईशान 8 धावांवर नाबाद राहिला.
न्यूझीलंडकडून सँटेनर व्यतिरिक्त हेन्री शिपलीने विकेट घेतली. त्याने रोहितला पायचीत केले.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. या निर्णयाला भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवत चांगली सुरुवात केली.
पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलेनला शून्यावर त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याला मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीचीही साथ मिळाली. त्यामुळे न्यूझीलंडने केवळ 15 धावांवर 5 विकेट्स गमावल्या.
त्यानंतर 6 व्या विकेटसाठी ग्लेन फिलिप्स आणि मायकल ब्रेसवेल यांनी 41 धावांची भागीदारी करत डाव सावरला. पण ब्रेसवेल 22 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर फिलिप्सला मिशेल सँटेनरने साथ दिली. त्यांनी 47 धावांची भागीदारी केली. पण हे दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आणि एकामागोमाग बाद झाले.
फिलिप्सने 36 आणि सँटेनर 27 धावांवर बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडची खालची फळी फार झुंज देऊ शकली नाही आणि न्यूझीलंड संघ 34.3 षटकात 108 धावांवर सर्वबाद झाला.
भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
आता या मालिकेतील तिसरा सामना 24 जानेवारी रोजी इंदोरला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखण्याचे भारताचे उद्दिष्ट असेल, तर न्यूझीलंड प्रतिष्ठा राखण्याच्या हेतूने मैदानात उतरतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.