

IND vs ENG U19 World Cup Final: भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर 100 धावांनी विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयासह टीम इंडियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफीवर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ठराविक अंतराने कोसळला.
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज टिकू शकले नाहीत. फलंदाजीमध्ये भारतीय फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळी करत सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. या विजयामुळे भारतीय क्रिकेट विश्वात आनंदाचे वातावरण असून युवा खेळाडूंच्या या अजोड यशावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताने पुन्हा एकदा ज्युनियर क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.
या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय कर्णधार आयुषने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात हवी तशी झाली नाही. एरॉन जार्ज अवघ्या 9 धावांवर बाद झाला आणि सुरुवातीला वैभव सूर्यवंशी खेळपट्टीवर चाचपडताना दिसत होता. मात्र, कर्णधार आयुष मैदानात आल्यावर खेळाचे चित्र पूर्णपणे पालटले. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. वैभवने आपला आक्रमक फॉर्म परत मिळवत चौफेर फटकेबाजी सुरू केली. आयुषनेही 51 चेंडूंत 53 धावांची संयमी पण वेगवान खेळी करत वैभवला मोलाची साथ दिली. कर्णधार बाद झाल्यानंतरही वैभवचा झंझावात थांबला नाही. त्याने अवघ्या 55 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले आणि त्यानंतर थेट दीडशे धावांचा टप्पा पार करत अनेक नवनवे विक्रम प्रस्थापित केले.
वैभव सूर्यवंशीने 175 धावांची ऐतिहासिक खेळी खेळून इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल करुन सोडले. तो बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या गोटात थोडा सुटकेचा नि:श्वास टाकला गेला खरा, पण तोपर्यंत भारताने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. शेवटच्या षटकांमध्ये इतर फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने निर्धारित 50 षटकांत 411 धावांचा डोंगर उभा केला. विश्वचषकाच्या फायनलमध्ये 400 हून अधिक धावांचा पाठलाग करणे हे कोणत्याही संघासाठी हिमालय सर करण्यासारखेच आव्हान होते.
412 धावांचे विशाल लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात अत्यंत संथ झाली. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे पहिल्या तीन षटकांत त्यांना केवळ दोन धावा काढता आल्या. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात इंग्लंडचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होऊन तंबूत परतले. मधल्या फळीत काही छोट्या भागीदारी झाल्या, पण त्या विजयासाठी पुरेशा नव्हत्या. भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत इंग्लंडवरचा दबाव कायम ठेवला.
अखेर इंग्लंडचा संपूर्ण संघ 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 311 धावांवर त्यांचा डाव आटोपला. अशा प्रकारे भारताने 100 धावांच्या फरकाने हा सामना जिंकून सहाव्यांदा विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान केला. विशेष म्हणजे, टीम इंडियाने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न हारता 'अजेय' राहून हे विजेतेपद मिळवले आहे. इंग्लंडचा विजयरथ फायनलमध्ये रोखत भारताने पुन्हा एकदा ज्युनियर क्रिकेटमध्ये आपणच 'किंग' आहोत हे सिद्ध केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.