India vs Australia 3rd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान हा सामना निर्णायक सामना आहे. त्यामुळे या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनही महत्त्वाची ठरणार आहे.
भारताला या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १० विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघात काही बदल होणार का, असे प्रश्न अनेकांना पडले आहे. त्याचबरोबर या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव धावा करण्याच अपयशी ठरला होता. त्याला मिचेल स्टार्कने दोन्ही सामन्यात शुन्यावर बाद केले होते.
त्यामुळे सूर्यकुमारला या सामन्यासाठी भारतीय संघात कायम केले जाणार की वगळणार असा प्रश्न होता. मात्र भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यानंतरच स्पष्ट केले होते की सूर्यकुमारला यापुढेही पाठिंबा दिला जाईल. त्यामुळे सूर्यकुमार तिसरा वनडे सामनाही खेळण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, जरी त्याला संधी मिळाली, तरी त्याच्या फलंदाजी क्रमवारीत बदल केला जाऊ शकतो. त्याला सहाव्या आणि हार्दिक पंड्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते.
याबरोबरच भारतीय संघात कर्णधार रोहित शर्माबरोबर शुभमन गिलच सलामीला उतरू शकतो. त्याचबरोबर मधल्या फळीत सूर्यकुमारबरोबरच विराट कोहली आणि केएल राहुल कायम राहू शकतात. फलंदाजीत हार्दिक आणि रविंद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूही योगदान देऊ शकतात.
गोलंदाजी फळीबद्दल बोलायचे झाल्यास एमए चिदंबरम स्टेडियमवर फिरकी गोलंदाजांना साथ मिळते. मात्र सध्या चेन्नईत पाऊस पडला आहे, त्याचबरोबर बुधवारी देखील पावसाची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते.
त्यामुळे भारतीय संघाला अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर आणि उमरान मलिक यांच्यातील कोणाला संधी द्यायची हा कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे. तरी भारतीय संघ अक्षरवरच अधिक विश्वास ठेवण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. तो फिरकी गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही सखोलता देतो.
याशिवाय फिरकी गोलंदाजीसाठी जडेजाबरोबरच कुलदीप यादवच कायम राहू शकतो, तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या खांद्यावरच अधिक राहू शकते. याशिवाय त्यांना हार्दिकची साथ मिळू शकते.
दरम्यान, या वनडे मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला आहे, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. त्यामुळे मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना निर्णयक ठरणार आहे.
तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल/शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.