India vs Australia 2nd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी (19 मार्च) वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकात म्हणजे 234 चेंडू राखत 10 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने मोठे विक्रमही नावावर केले आहेत.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करताना भारताला 26 षटकात 117 धावांवर रोखले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकातच बिनबाद 121 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
ऑस्ट्रेलियाने हा भारताविरुद्ध वनडेत 10 विकेट्सने विजय मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध भारतात 10 विकेट्सने वनडे सामना दोन वेळा जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर 14 जानेवारी 2020 रोजी झालेल्या वनडे सामन्यात भारताविरुद्ध 10 विकेट्सने विजय मिळवला होता.
ऑस्ट्रेलियाने हा सामना 10 विकेट्सने जिंकल्याने आता रोहितही वनडेत 10 विकेट्सने पराभव स्विकारणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे. यापूर्वी सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी भारताचे नेतृत्व करताना वनडेत 10 विकेट्सने पराभव स्विकारला आहे.
रोहित प्रमाणेच विराटनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच कर्णधार म्हणून वनडेत 10 विकेट्सने पराभव स्विकारला आहे.
ऑस्ट्रेलियाने रविवारी 234 चेंडू राखून भारताविरुद्ध वनडे सामना जिंकल्याने मोठा विक्रमालाही गवसणी घातली आहे. भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये चेंडूंच्या तुलनेत मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. त्यांनी 2019 मध्ये हेमिल्टनला झालेल्या वनडेत २१२ चेंडू राखून भारताविरुद्ध विजय मिळवला होता. तसेच 2010 मध्ये डंबुल्लामध्ये झालेल्या वनडेत श्रीलंकेने भारताला 209 चेंडू राखून पराभूत केले होते.
आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका या तीन संघांनाच वनडेत भारताविरुद्ध 200 पेक्षा जास्त चेंडू राखून विजय मिळवता आला आहे.
भारताविरुद्ध वनडेत सर्वात मोठा विजय मिळवणारे संघ (चेंडू राखून)
234 चेंडू - ऑस्ट्रेलिया (विशाखापट्टणम, 2023)
212 चेंडू - न्यूझीलंड (हेमिल्टन, 2019)
209 चेंडू - श्रीलंका (डंबुल्ला, 2010)
181 चेंडू - श्रीलंका (हंबांटोटा, 2012)
176 चेंडू - श्रीलंका (धरमशाला, 2017)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.