India vs Australia, 2nd T20I Match at Thiruvananthapuram, Yashasvi Jaiswal, Ruturaj Gaikwad, Ishan Kishan Fifty:
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (26 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिरुवनंतरपुरमला झालेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 44 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या या टी20 मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवली आहे. दरम्यान, या सामन्यात भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी मिळून एक खास विक्रम केला आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली होती. यावेळी भारताकडून सलामीला उतरलेल्या यशस्वी जयस्वालने 25 चेंडूत 53 धावा केल्या, तर ऋतुराज गायकवाडने 43 चेंडूत 58 धावा केल्या. तसेच ईशान किशनने 32 चेंडूत 52 धावा केल्या.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच झाले की एकाच डावात भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके केली. पण आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून कोणत्याही क्रमांकावरील तीन फलंदाजांनी एका डावात अर्धशतके करण्याची ही चौथी वेळ आहे.
यापूर्वी 2007 साली इंग्लंडविरुद्ध डर्बनला झालेल्या टी20 सामन्यात भारताकडून विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांनी अर्धशतके केली होती. तसेच मुंबईला 2019 साली वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात भारताकडून रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांनी अर्धशतके केली होती.
तसेच गेल्यावर्षी म्हणजेच २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध सिडनीला झालेल्या टी20 सामन्यात भारताकडून रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके केली होती.
दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताकडून पहिल्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके केल्यानंतर अखेरीस रिंकू सिंगने आक्रमक खेळ केला. त्याने 9 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.
त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 235 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत नॅथन एलिसने 3 विकेट्स घेतल्या, तर मार्कस स्टॉयनिसने 1 विकेट घेतली.
त्यानंतर भारताने दिलेल्या 236 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 9 बाद 191 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसने 25 चेंडूत 45 धावांची खेळी केली, तर टीम डेव्हिडने 22 चेंडूत 37 धावा केल्या. तसेच कर्णधार मॅथ्यू वेडने 23 चेंडूत 43 धावांची खेळी केली. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.
गोलंदाजीत भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.