Hardik Pandya Set to Return in Mumbai Indians for IPL 2024 :
इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाचा लिलाव होण्यापूर्वी 26 नोव्हेंबर सर्व फ्रँचायझींना संघात कायम केलेल्या खेळाडूंची आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अखेरची तारीख होती. गुजरात टायटन्स संघानेही खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पण यानंतर पुन्हा उलटफेर झाल्याचे समजत आहे.
26 नोव्हेंबर रोजी 4 वाजेपर्यंत संघात कामय केलेल्या खेळाडूंची यादी संघांना जाहीर करायची होती, त्याप्रमाणे गुजरातने 4 वाजता हार्दिक पंड्याला संघात कायम केले होते. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण गेल्या दोन दिवसांपासून गुजरात त्याला मुंबई इंडियन्सकडे ट्रेड करणार असल्याची चर्चा होती. मात्र, गुजरातने त्याला संघात कायम केले.
परंतु, गुजरातने खेळाडूंची यादी जाही केल्यानंतर दोनच तासात अशी बातमी समोर आली की मुंबई इंडियन्सने त्यांच्या संघात कायम केलेल्या कॅमेरॉन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ट्रेड केले आहे. ग्रीनला मुंबईने गेल्यावर्षी 17.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्याला ट्रेड केल्यानंतर मुंबईने गुजरातकडून हार्दिकला 15 कोटींची किंमत मोजत पुन्हा संघात घेतले आहे.
गुजरातने आयपीएल 2022 आधी हार्दिकला 15 कोटी रुपयांच्या मानधनासह संघात घेतले होते. त्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी मुंबईला 15 कोटींची गरज होती. मात्र, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स यांसारख्या मोठ्या खेळाडूंना संघातून करारमुक्त केल्यानंतरही त्यांच्याकडे आयपीएल 2024 लिलावासाठी 15.25 कोटी रुपये पर्समध्ये शिल्लक आहेत.
त्यामुळे जर यातील 15 कोटी रुपये एकट्या हार्दिकसाठी वापरले, तर लिलावात मुंबईला पैसे कमी पडू शकले असते. अशात इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार मुंबईने ग्रीनला बेंगलोरबरोबर ट्रेड केले आहे. त्यामुळे त्यांच्या पर्समध्ये आणखी १७.५ कोटींची भर पडली आहे. त्यातून त्यांनी 15 कोटी हार्दिकसाठी मोजत त्याला पुन्हा आपल्या संघात घेतले आहे.
दरम्यान, या गोष्टी रिपोर्टमधून समोर आल्या आहेत. अद्याप मुंबई इंडियन्स किंवा गुजरात टायटन्स किंवा हार्दिक पंड्याकडून याबद्दल अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्याचमुळे आता याबद्दल अधिकृत पुष्टी कधी होणार की या केवळ अफवा आहेत, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
आयपीएल 2024 साठी ट्रेडिंग विंडो 12 डिसेंबरपर्यंत सुरू आहेत. त्यामुळे तोपर्यंत याबद्दल अधिकृत माहिती समोर येऊ शकते. त्यानंतर 19 डिसेंबर रोजी लिलाव पार पडणार आहे.
हार्दिकच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले, तर त्याने 2015 साली मुंबई इंडियन्सकडूनच पदार्पण केले होते. त्यावेळी मुंबईने त्याला 10 लाखांच्या किंमतीत संघात संधी दिली होती. त्यानंतर हार्दिक 2021 पर्यंत याच संघाकडून आयपीएलमध्ये खेळला.
तो 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या मुंबई संघाचाही भाग होता. त्यानंतर 2022 आयपीएलपूर्वी मुंबईने त्याला संघातून करारमुक्त केले.
त्यानंतर गुजरातने त्याला संघात घेत नेतृत्वाचीही जबाबदारी दिली. हार्दिकने कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात म्हणजे आयपीएल 2022 हंगामाचे विजेतेपद गुजरातला मिळवून दिले. तसेच आयपीएल 2023 मध्येही त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात अंतिम सामन्यात खेळले, पण त्यांना चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव स्विकारावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.