

BCCI IND Vs AFG ODI Match Date Change: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी भारतविरुद्ध अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली असून यासोबतच मालिकेच्या वेळापत्रकात एक महत्त्वाचा बदलही करण्यात आला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या या मालिकेत एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत, ज्यामध्ये एका कसोटी सामन्याचा आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा समावेश आहे.
बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या नवीन माहितीनुसार, संपूर्ण वेळापत्रकामध्ये केवळ पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला, तर इतर सर्व सामन्यांचे वेळापत्रक आणि ठिकाण पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. क्रिकेट चाहत्यांनी या बदललेल्या तारखेची नोंद घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन त्यांचा आवडता सामना हुकणार नाही.
या आंतरराष्ट्रीय मालिकेची सुरुवात 6 जून रोजी होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याने होणार आहे. हा कसोटी सामना न्यू चंदीगड येथे खेळवला जाणार असून, सामना पूर्ण पाच दिवस चालल्यास 10 जूनपर्यंत सुरु राहील. या कसोटी सामन्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका रंगणार आहे.
आधीच्या वेळापत्रकानुसार मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 14 जून रोजी म्हणजेच रविवारी होणार होता, परंतु काही कारणास्तव बीसीसीआयने यामध्ये बदल केला. आता हा पहिला वनडे सामना 13 जून रोजी खेळवला जाईल. तारखेत बदल झाला असला तरी सामन्याचे ठिकाण बदललेले नाही; हा सामना धरमशाला येथील मैदानावरच खेळवला जाईल.
मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या वेळापत्रकात कोणताही फेरबदल करण्यात आलेला नाही. दुसरा एकदिवसीय सामना 17 जून रोजी लखनऊ येथे खेळवला जाईल, तर तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 20 जून रोजी चेन्नईच्या मैदानावर पार पडेल. ही मालिका भारतीय संघासाठी (Team India) अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण या मालिकेतून 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात होणार आहे. या मालिकेदरम्यान वरिष्ठ खेळाडूंचा फॉर्म, त्यांची तंदुरुस्ती यावर विशेष लक्ष ठेवले जाईल, तसेच काही नवीन आणि तरुण खेळाडूंना आजमावून पाहण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाला मिळणार आहे.
या मालिकेसाठी बीसीसीआयने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही संघांची घोषणा केली. भारतीय कसोटी संघात शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर बर्रार, हर्ष दुबे आणि ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक) यांचा समावेश आहे.
तर एकदिवसीय संघाची धुराही शुभमन गिलकडेच सोपवण्यात आली असून संघात शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के. एल. राहुल (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर बर्रार आणि हर्ष दुबे या खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.