India spinner Axar Patel unusual request to umpire during cold weather in Mohali
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात गुरुवारी (11 जानेवारी) टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियम येथे झाला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यादरम्यान मोहालीत प्रचंड थंड वातावरण होते. खेळाडूंनीही अंगावर स्वेटर चढवलेले होते. या थंड वातावरणात गोलंदाजी करताना भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने मैदानावरील पंचांकडे एक अनोखी मागणी केली होती. याबद्दल त्याने सामन्यानंतर खुलासा केला आहे.
त्याने सांगितले की एका हातात ग्लव्ह्ज घालून खेळण्याची विनंती त्याने केली होती, जी पंचांनी अमान्य केली.
अक्षरने ब्रॉडकास्टर जिओ सिनेमाशी बोलताना सांगितले की 'मला चेंडू हातात असल्याचे जाणवतही नव्हते, इतकी थंडी होती. आम्हाला माहित आहे की हिवाळा आहे आणि त्यामुळे थंडी असणार. परंतु, मी फक्त माझ्या गोलंदाजीबद्दल आणि त्यांच्यावर दबाव कसा टाकता येईल, याचा विचार करत होतो. मैदानात खुप दव होते. पण मी माझ्या अचुकतेवर लक्ष केंद्रित केले होते.'
तो पुढे म्हणाला, 'मी पंचांना विचारले की मी एका हातात ग्वव्ह्ज घालून गोलंदाजी करू का, पण ते मला नाही म्हणाले.'
असे असले तरी अक्षरने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २३ धावात २ विकेट्स घेतल्या.
अक्षरने असेही सांगितले की सध्या त्याचे लक्ष आयपीएलवर आहे. तसेच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिकाही आगामी काळात होणार आहे.
सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानने 20 षटकात 5 बाद 158 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून मोहम्मग नबीने 42 धावांची खेळी केली.
भारताकडून गोलंदाजीत अक्षर पटेल व्यतिरिक्त मुकेश कुमारने 2 विकेट्स घेतल्या. तसेच शिवम दुबेने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिवम दुबेने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने 40 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 60 धावा केल्या. तसेच शुभमन गिल (23), तिलक वर्मा (26), जितेश शर्मा (31) आणि रिंकू सिंग (16*) यांनी छोटेखानी खेळी केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानने २ विकेट्स घेतल्या.