India vs Afghanistan 1st T20I at Mohali, Shivam Dube Man of the Match:
भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
मोहालीत मिळवलेल्या पहिल्या सामन्यातील विजयात अष्टपैलू शिवम दुबेने मोलाचा वाटा उचलला. त्याने 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 40 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 60 धावांची नाबाद खेळी केली.
भारतासाठी विजयी चौकारही त्यानेच खेचला. तसेच त्याने गोलंदाजी करताना अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झाद्रानची विकेटही घेतली. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
दरम्यान, सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर दुबेने आपल्या खेळाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की त्याने त्याच्या शैलीतच क्रिकेट खेळले.
तो म्हणाला, 'मला वाटते खूप थंडी होती, पण या मैदानात खेळताना मला मजा आली. भारताकडून खेळी दिवसांनी खेळणे आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची असल्याने माझ्यावर थोडा दबाव होता. परंतु, एक गोष्ट माझ्या डोक्यात पक्की होती की मला माझ्या स्टाईलचे क्रिकेट खेळायचे आहे.'
'पहिले 2-3 चेंडू खेळताना मला दबाव वाटला, पण नंतर मी चेंडूवर लक्ष केंद्रित केले. मी काय चालू आहे, याचा फार विचार केला नाही. मला माहित आहे मी टी20 क्रिकेटमध्ये मोठे षटकार मारू शकतो, त्यामुळे मी कधीही धावा करू शकतो.'
तसेच रोहितबरोबर झालेल्या चर्चेबद्दलही दुबेला विचारण्यात आले. त्याबद्दल दुबे म्हणाला, 'रोहितने मला सांगितले की मी चांगले खेळलो आणि मी आगामी सामन्यात आणखी काय सुधारणा करू शकतो. आज मला गोलंदाजीचीही संधी मिळाली आणि मी माझ्या योजनांची अंमलबजावणी केली.'
या सामन्यात 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुबेला तिलक वर्मा (26), जितेश शर्मा (31) आणि रिंकू सिंग (16*) यांनी चांगली साथ दिली. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानने 2 विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 158 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने 42 धावांची खेळी केली. भारताकडून गोलंदाजी करताना दुबेव्यतिरिक्त मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.