

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा 'महामुकाबला' ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मात्र, क्रिकेटप्रेमींच्या मनात एकच धाकधूक आहे जर या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर काय होईल? आयसीसीने (ICC) या परिस्थितीसाठी काही स्पष्ट नियम आखून दिले आहेत.
आयसीसीने या फायनलसाठी एक 'रिझर्व्ह डे' (९ मार्च) राखून ठेवला आहे. जर ८ मार्चला पावसामुळे खेळ होऊ शकला नाही किंवा अपूर्ण राहिला, तर ९ मार्चला तिथूनच पुढे खेळ सुरू होईल. सामना पूर्ण करण्यासाठी आयसीसीने अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळही दिला आहे. जर पावसाने वारंवार व्यत्यय आणला, तर ओव्हर्स कमी करून सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, निकालासाठी दोन्ही संघांना किमान १०-१० षटके खेळणे अनिवार्य आहे.
जर ८ आणि ९ मार्च या दोन्ही दिवसांत पावसामुळे खेळ होऊ शकला नाही किंवा सामना पूर्ण झाला नाही, तर आयसीसीच्या नियमानुसार भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना 'संयुक्त विजेते' (Joint Winners) घोषित केले जाईल.
क्रिकेटच्या इतिहासात अशी दुर्मिळ स्थिती उद्भवल्यास दोन्ही संघ ट्रॉफी वाटून घेतात. भारतासोबत २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशीच स्थिती उद्भवली होती, तेव्हा श्रीलंका आणि भारत हे संयुक्त विजेते ठरले होते.
भारतीय संघ सध्या डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आजवर एकाही संघाने सलग दोनदा ट्रॉफी जिंकलेली नाही. भारताकडे हा विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी आहे.
दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ आपली पहिली टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे, टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताने न्यूझीलंडला कधीही हरवलेले नाही, त्यामुळे या सामन्यात एक ऐतिहासिक चुरस पाहायला मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.