Ravi Shastri on Virat Kohli: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (7 जून) कसोटी चॅम्पियनशीप 2021- 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. लंडनमधील द ओव्हल मैदानावर होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे.
दरम्यान, या सामन्याआधी भारताचे माजी अष्टपैलू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाला अप्रत्यक्षरित्या भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
शास्त्री यांनी प्रशिक्षक म्हणून विराटबरोबर बराच वेळ घालवला असल्याने ते त्याला चांगल्या प्रकारे ओळखतात. त्याचमुळे त्यांनी त्यांच्या अनुभवातून आपले मत मांडले आहे. शास्त्री यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे की विराट 20 धावांपर्यंत पोहचल्यानंतर धोकादायक ठरु शकतो.
शास्त्री म्हणाले, 'जर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना असेल, तर विराट वेगळ्या मानसिकतेने उठेल. जर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना असेल, तर तो कॉफीचा अस्वाद खूप आधी घेईल. त्यामुळे, जर तो चांगला खेळत असेल आणि तो 20 धावांपर्यंत पोहचला, तर आपल्याला पाहायला मजा येईल.'
शास्त्रींच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओही आयसीसीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यावर क्रिकेट चाहत्यांच्या विविध कमेंट्सही येत आहेत.
दरम्यान, विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने फेब्रुवारी-मार्च 2023 दरम्यान ऑस्ट्लेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान देखील अहमदाबादला झालेल्या कसोटीत शतक केले होते. हे त्याने तब्बल 3 वर्षांनी केलेले कसोटी शतक होते.
या कसोटी मालिकेनंतर तो आयपीएल 2023 मध्येही चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसला होता. त्याने आयपीएल 2023 मध्ये सलग दोन शतकेही केली होती. त्याने 14 सामन्यांत 639 धावा केल्या होत्या.
या अंतिम सामन्यात जर विराटने 55 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण करेल. तसेच जर त्याने 55 धावा केल्या, तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5000 धावा करणारा दुसराच खेळाडूही ठरेल. यापूर्वी असा विक्रम केवळ सचिन तेंडुलकरने (6707) केला आहे.
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 92 सामन्यांमध्ये 50.97 च्या सरासरीने 16 शतकांसह 4945 धावा केल्या आहेत. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा सचिननंतर दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
विराटने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 4945 धावांपैकी कसोटीमध्ये 24 सामन्यांमध्ये 48.26 च्या सरासरीने 1979 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 8 शतकांचा आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.