

हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याच्या आणि मुंबईशी संबंधित सर्व पोस्ट हटवल्याच्या बातम्यांनी क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. हार्दिकला संघातून डच्चू दिल्यानंतर हा वाद अधिक विकोपाला गेल्याचे बोलले जात आहे. आयपीएल २०२६ मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी अत्यंत खालावलेली पाहायला मिळाली.
यंदाच्या हंगामात हार्दिक पंड्या ना फलंदाजीत चमकला, ना गोलंदाजीत. त्याच्या नेतृत्वाखाली संघ वारंवार पराभूत होत असल्याने व्यवस्थापनाने कठोर निर्णय घेत त्याला चक्क संघातूनच वगळले (ड्रॉप केले). त्याच्या जागी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली.
गेल्या दोन सामन्यांत सूर्यानेच कमान सांभाळली, मात्र तरीही मुंबईच्या नशिबात बदल झाला नाही. याच काळात हार्दिकने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याने तो आता संघ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्तानुसार, हार्दिकने खरोखरच मुंबई इंडियन्सला अनफॉलो केले होते आणि काही पोस्टही डिलीट केल्या होत्या. मात्र, थोड्या वेळानंतर त्याने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला फॉलो करण्यास सुरुवात केली.
हार्दिकने २ मे रोजी आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आल्यावर तो सीएसके (CSK) किंवा केकेआर (KKR) मध्ये ट्रेड होणार, अशा अफवांना पेव फुटले. सध्याची स्थिती पाहता, त्याने पुन्हा फॉलो केल्याने हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते, पण वरिष्ठ खेळाडूंसोबतचे त्याचे संबंध अद्याप ताणलेले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हार्दिकने या हंगामात ८ सामन्यांत केवळ १४६ धावा केल्या आणि ४ बळी घेतले. त्याच्या या सुमार कामगिरीचा फटका पाचवेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला बसला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.