Two Indian Cricketers may be rested for T20I series against Ireland: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. सध्या भारताचे वेळापत्रक चांगलेच व्यस्त आहे. 13 ऑगस्टला वेस्ट इंडिजचा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 18 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आयर्लंड दौऱ्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड समिती भारताचा टी२० कर्णधार हार्दिक पंड्या आणि सलामीवीर शुभमन गिल यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. आगामी आशिया चषक आणि वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेता खेळाडूंचा ताण कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
29 वर्षीय हार्दिक सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. तो या दौऱ्यात वनडे संघाचा उपकर्णधार आहे, तर टी20 मालिकेत नेतृत्व करणार आहे. तसेच गिल सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे, तर तो वनडे आणि टी20 मालिकेसाठीही भारतीय संघाचा भाग आहे.
त्यामुळे गिलला आयर्लंड दौऱ्यातून विश्रांती मिळू शकते, तर हार्दिकला पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता, त्यालाही वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून विश्रांती मिळू शकते.
याबद्दल बीसीसीआयच्या एका सुत्राने पीटीआयला माहिती दिली की 'अजून काहीही अंतिम निर्णय झालेला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेनंतर हार्दिकला कसे वाटत आहे, यावर हे अवलंबून आहे. फ्लोरिडाहून डब्लिनला जाण्यापूर्वी तीन दिवसांच्या प्रवासाचा यात समावेश आहे.'
'वर्ल्डकपला पहिले प्राधान्य आहे, त्यामुळे त्याच्यावरील वर्ल्डलोडचा विचार करावा लागेल. हे विसरून चालणार नाही की तो वर्ल्डकपमध्ये उपकर्णधार असणार आहे.'
वेस्ट इंडिज दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना फ्लोरिडाला होणार आहे. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धचे वनडे आणि टी20 मालिकेतील मिळून 8 सामने बार्बाडोस, त्रिनिदाद, गयाना आणि फ्लोरिडा या चार ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाला डब्लिनला जावे लागणार आहे.
दरम्यान, जर हार्दिकला विश्रांती दिली, तर आयर्लंडविरुद्ध सूर्यकुमार यादव किंवा ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची धूरा सोपवली जाऊ शकते. सूर्यकुमार वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत उपकर्णधार आहे. तसेच ऋतुराजकडे चीनमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्ससाठी भारताचे कर्णधारपद सोपवले आहे.
बीसीसीआय केवळ हार्दिक आणि गिललाच नाही, तर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनाही आयर्लंड दौऱ्यादरम्यान विश्रांती देण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आयर्लंड दौऱ्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणकडे प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच एनसीएमधील सितांशू कोटक, ट्रॉय कूली आणि साईराज बहुतुले यांचाही सपोर्ट स्टाफमध्ये समावेश करण्यात येऊ शकतो.
भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यावर 3 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी जायचे आहे. ही मालिका 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या मालिकेतील तिन्ही टी20 सामने डब्लिनच्या सीमेवरील मलाहाईड येथे होणार आहेत.
18 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)
20 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)
23 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, मलाहाईड (वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.