पणजी ः रणजी करंडक क्रिकेट सामन्यात माजी विजेत्या मुंबईला माफक धावसंख्येत गुंडाळल्यानंतर गोव्याच्या तळाच्या फलंदाजांनी शुक्रवारी किल्ला लढविला. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्यांनी त्रिशतकी मजल मारत 164 धावांची आघाडी संपादली. अर्धशतकवीर एकनाथ केरकर व लक्षय गर्ग यांनी आठव्या विकेटसाठी केलेली 96 धावांची भागीदारी निर्णायक ठरली.
मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर एलिट ड गट सामना सुरू आहे. गोव्याने मुंबईचा डाव 163 धावांत गुंडाळला होता. कालच्या 2 बाद 114 वरून गोव्याने पहिल्या डावात 327 धावा केल्या. मुंबईचा फिरकी गोलंदाज शम्स मुलानी याने 107 धावांत 6 गडी बाद केले. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर शुक्रवारी मुंबईने कर्णधार पृथ्वी शॉ याला गमावून दुसऱ्या डावात 1 बाद 57 धावा केल्या. ते अजून 107 धावांनी मागे आहेत. दिवसातील दोन षटके बाकी असताना गोव्याचा डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ याने पृथ्वी (44) याला पायचीत बाद केले.
एकनाथची फलंदाजी महत्त्वपूर्ण
मुंबईतर्फे रणजी क्रिकेट (Cricket) कारकिर्दीस सुरवात केलेला, पण गतमोसमापासून गोव्याचे प्रतिनिधित्व करणारा यष्टिरक्षक-फलंदाज एकनाथ केरकर यांची फलंदाजी गोव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने लक्षय गर्ग याच्यासमवेत चिवटपणे खेळत गोव्याला त्रिशतक पार करून दिले. सलग तिसऱ्या डावात अर्धशतक करताना एकनाथने 148 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. मुंबईच्या पहिल्या डावात 6 गडी टिपलेल्या लक्षयने फलंदाजीतही चमक दाखविली. त्याने 86 चेंडूंत 59 धावा करताना सात चौकार व दोन षटकार मारले. त्यापूर्वी, सकाळच्या सत्रातील घसरगुंडीनंतर एकनाथने श्रीकांत वाघ (24) याच्या साथीत सातव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी करून गोव्याला सावरले होते.
सकाळच्या सत्रात गोव्याची पडझड
गोव्यासाठी (goa) कालची नाबाद जोडी अमोघ देसाई (64) व कर्णधार स्नेहल कवठणकर (37) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली, मात्र मुलानी याच्या भेदक फिरकीसमोर गोव्याची पडझड झाली. या 24 वर्षीय डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने नऊ धावांच्या अंतरात स्नेहल, अमोघ व शुभम रांजणे (0) यांना नऊ धावांत माघारी धाडल्यामुळे गोव्याची 5 बाद 153 अशी स्थिती झाली. उपाहाराच्या ठोक्याला धवल कुलकर्णीने दर्शन मिसाळ (15) याला बाद केल्यामुळे गोव्याचा डाव लवकर संपुष्टात येण्याची चिन्हे होती, मात्र नंतर एकनाथने तळाच्या फलंदाजांसह प्रतिकार करत मुंबईच्या (Mumbai) गोलंदाजांना सतावले. नंतर शेवटच्या तीन विकेट पाच धावांत गमावल्यामुळे गोव्याला साडेतीनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
मुंबई, पहिला डाव ः 163 व दुसरा डाव ः 16 षटकांत 1 बाद 57 (पृथ्वी शॉ 44 , आकर्षित गोमेल नाबाद 13, धवल कुलकर्णी नाबाद 0, लक्षय गर्ग 2-1-14-0, अमित यादव 5-1-22-0, दर्शन मिसाळ 6-2-13-1, अमूल्य पांड्रेकर 3-0-8-0).
गोवा, पहिला डाव ः 104.4 षटकांत सर्वबाद 327 (अमोघ देसाई 64, सुमीरन आमोणकर 6, सुयश प्रभुदेसाई 40, स्नेहल कवठणकर 37, शुभम रांजणे 0, एकनाथ केरकर 71, दर्शन मिसाळ 15, श्रीकांत वाघ 24, लक्षय गर्ग 59, अमूल्य पांड्रेकर नाबाद 4, अमित यादव 0, धवल कुलकर्णी 2-54, शम्स मुलानी 36.4-9-107-6, मोहित अवस्थी 1-49, तनुष कोटियन 1-64).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.