पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) अध्यक्षपदासाठी थेट लढत अपेक्षित असून व्यवस्थापकीय समितीतील सहा जागांसाठी तब्बल 32 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ही निवडणूक 27 ऑक्टोबर रोजी नियोजित आहे.
(Goa Cricket Association president election 27 October)
जीसीए निवडणूक अधिकारी डॉ. एम. मोदास्सीर यांनी शनिवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. त्यानुसार मावळत्या समितीतील सचिव विपुल फडके, माजी रणजीपटू महेश देसाई, शंभा देसाई, तुळशीदास शेट्ये यांनी अर्ज दाखल केले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंभा व तुळशीदास हा डमी उमेदवार असून लढत विपुल व महेश यांच्यातच लढत होण्याचे संकेत आहेत. विपुल हे माजी अध्यक्ष विनोद फडके यांचे पुत्र असून, महेश हे माजी अध्यक्ष चेतन देसाई यांचे बंधू आहेत. गोव्याच्या रणजी क्रिकेटमधील प्रारंभीच्या काळातील पहिल्या दोन मोसमात ते सहा सामने खेळले आहेत.
दाखल उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी (ता. 17) होईल. तर पात्र उमेदवारी अर्जांची यादी मंगळवारी (ता. 18) जाहीर केली जाईल. 19 व 20 ऑक्टोबर रोजी उमेदवार अर्ज मागे घेऊ शकणार आहेत.
दोघांची मुदत संपली
मावळत्या व्यवस्थापकीय समितीतील दोघांचा अपवाद वगळता इतर चार पदाधिकाऱ्यांनी यावेळी अर्ज सादर केला आहे. लोढा शिफारसींनुसार अध्यक्ष सूरज लोटलीकर यांची मुदत संपली आहे, तर सदस्य मोहन चोडणकर यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. मावळत्या समितीतील सचिव विपुल फडके, खजिनदार परेश फडते, उपाध्यक्ष शंभा देसाई, संयुक्त सचिव सय्यद अब्दुल माजिद यांनी यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
माजी सचिव दया पागी, माजी संयुक्त सचिव जमीर करोल, माजी उपाध्यक्ष अनंत नाईक, राज्य विधानसभेचे माजी सभापती राजेश पाटणेकर, माजी रणजीपटू हेमंत पै आंगले यांनीही अर्ज सादर केला आहे. सचिवपदासाठी अर्ज दाखल केलेले रोहन गावस देसाई यांच्यावरही लक्ष असेल. माजी उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांचा मुलगा सैबर मुल्ला याने खजिनदारपदासाठी अर्ज केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.