

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत आला आहे. ट्रिनबागो नाईट रायडर्स आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात फिलिप्सने घेतलेला झेल पाहून मैदानातील प्रेक्षकांसह खेळाडूही अवाक झाले. सीमारेषेजवळ हवेत झेप घेत एका हाताने पकडलेला हा झेल सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.
ट्रिनबागोच्या डावात सुनील नरेन फलंदाजी करत असताना गयाना संघाकडून ड्वेन प्रिटोरियस गोलंदाजी करत होता. प्रिटोरियसच्या आखूड चेंडूवर नरेनने लेग साइडच्या दिशेने जोरदार फटका मारला. चेंडू वेगाने सीमारेषेकडे जात असताना डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या फिलिप्सने क्षणार्धात हालचाल केली.
फिलिप्सने उजवीकडे धाव घेत योग्य वेळी हवेत उडी मारली आणि एका हाताने चेंडू पकडला. विशेष म्हणजे झेल घेताना त्याचे लक्ष थेट चेंडूकडे नव्हते. या अविश्वसनीय प्रयत्नामुळे नरेनला केवळ एका धावेवर माघारी परतावे लागले. झेल घेतल्यानंतर स्वतः फिलिप्सलाही या प्रयत्नावर काही क्षण विश्वास बसला नाही. त्याचा आनंद मैदानावर स्पष्टपणे दिसून आला.
या सामन्यात पावसामुळे खेळात सुमारे दीड तासाचा व्यत्यय आला. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर गयाना अॅमेझॉन वॉरियर्सने आक्रमक फलंदाजी केली. सुरुवातीच्या षटकांमध्ये दोन विकेट गमावल्यानंतर शिमरोन हेटमायरने डावाची सूत्रे हाती घेतली.
हेटमायरने अवघ्या 40 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याला रोमारियो शेफर्डकडूनही उपयुक्त साथ मिळाली. या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर गयानाने 16 षटकांत 5 बाद 185 धावा उभारल्या.
पावसामुळे सामन्याचे समीकरण बदलले आणि डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार ट्रिनबागो नाईट रायडर्ससमोर 182 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रिनबागोची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
कॉलिन मुनरोने काही आक्रमक फटके खेळले, पण नरेन स्वस्तात बाद झाल्याने संघावर दबाव वाढला. त्यानंतर निकोलस पूरनने आक्रमक फलंदाजी करत वेगाने धावा जमवल्या आणि पाचव्या षटकातच संघाला 50 धावांचा टप्पा ओलांडून दिला.
ट्रिनबागोला सामन्यात पुनरागमनाची संधी मिळत असतानाच मोहम्मद नबीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने किफायतशीर गोलंदाजी करत पूरनसह तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. त्यानंतर इमरान ताहिरने जस्टिन ग्रीव्हजला पायचीत करत ट्रिनबागोची अवस्था 68 धावांवर 5 बाद अशी केली.
संकटात सापडलेल्या ट्रिनबागोला एलेक्स हेल्स आणि अकील हुसेन यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. हेल्सने अवघ्या 23 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत सामन्यात रंगत निर्माण केली.
अखेरीस जोशुआ डी सिल्वानेही काही मोठे फटके मारले, मात्र गयानाच्या गोलंदाजांनी अखेरपर्यंत दबाव कायम ठेवला. ट्रिनबागोला निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचता आले नाही आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्सने सामना 9 धावांनी जिंकला.
या सामन्याचा निकाल गयानाच्या बाजूने लागला असला तरी ग्लेन फिलिप्सचा अविश्वसनीय झेल हा सामन्यातील सर्वाधिक चर्चेचा क्षण ठरला. त्याच्या अफलातून क्षेत्ररक्षणाने पुन्हा एकदा तो क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक का मानला जातो, हे दाखवून दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.