धोनी-जड्डूची दोस्ती ते गिलची शतकं; IPL 2023 मधील 7 अविस्मरणीय क्षण

आयपीएल 2023 मध्ये काही घटना क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय क्षण ठरतील. अशाच काही घटनांचा घेतलेला आढावा
IPL 2023 Best Moments
IPL 2023 Best Moments Dainik Gomantak

IPL 2023 Best Moments: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेची अखेर 30 मेच्या मध्यरात्री सांगता झाली. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आमने-सामने आले होते. यावेळी चेन्नईने 5 विकेट्सने विजय मिळवला आणि पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.

दरम्यान, साधारण दोन महिने झालेल्या या हंगामात 74 सामने खेळवण्यात आले. या दोन महिन्यात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. अगदी अखेरचा सामनाही अखेरच्या चेंडूवर संपला. कधी गोलंदाजांचे, तर कधी फलंदाजांचे वर्चस्व राहिले.

या संपूर्ण हंगामात काही घटना अशाही घडल्या, जे क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय क्षण ठरतील. अशाच काही घटनांवर नजर टाकू.

IPL 2023 Best Moments
IPL 2023 Awards and Prize Money: चेन्नई-गुजरातच नाही, तर 'हे' खेळाडूही मालामाल! पाहा पुरस्कारांची संपूर्ण लिस्ट

1. एमएस धोनीने जडेजाला उचलले...

अंतिम सामन्यात या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससमोर पावसाच्या अडथळ्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 171 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या दोन चेंडूत चेन्नईला 10 धावांची गरज होती.

यावेळी चेन्नईकडून रविंद्र जडेजा मोहित शर्माच्या गोलंदाजीवर अखेरच्या दोन चेंडूत षटकार आणि मग विजयी चौकार मारला. त्यामुळे चेन्नईने या सामना जिंकत विजेतेपही नावावर केले. यानंतर चेन्नईच्या संघाने मोठा जल्लोष केला.

याच जल्लोषादरम्यान चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने जडेजाला मिठी मारत त्याला उचलून घेतले होते. हा क्षण अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरला असेल.

2. रिंकू सिंगचे 5 षटकार

आयपीएल 2023 मध्ये 9 एप्रिलला झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 205 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला अखेरच्या 5 चेंडूंवर 28 धावांची गरज होती.

यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करत असलेल्या यश दयाल विरुद्ध रिंकू सिंगने सलग 5 षटकार मारले होते. त्यामुळे कोलकाताने हा सामना सहज जिंकला होता.

3. सर्वत्र धोनी चाहते

आयपीएल 2023 चेन्नईचा कर्णधार धोनीचा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा होती. त्यामुळे या हंगामात धोनीला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. केवळ चेन्नईचे घरचे मैदान एमए चिदंबरम स्टेडियमवरच नाही, तर चेन्नईचा संघ या हंगामात जेवढ्या स्टेडियमवर खेळला. तेवढ्या मैदानांवर धोनीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहते आल्याचे दिसले. यावेळी चाहते धोनीच्या नावाने मोठ्या प्रमाणात घोषणा देत असल्याचेही दिसले.

4. गावसकरांनी घेतली धोनीची स्वाक्षरी

चेन्नई सुपर किंग्सने 14 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) सामना खेळला. हा घरच्या मैदानावरील या हंगामातील चेन्नईचा अखेरचा साखळी सामना असल्याने धोनीसह संपूर्ण संघाने चेपॉक स्टेडियमची फेरी मारत चाहत्यांचे आभार मानले.

त्याचवेळी भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर पळत धोनीकडे आले आणि त्यांनी पेन धोनीसमोर करत त्याला त्यांच्या शर्टवर स्वाक्षरी करण्यासाठी त्याच्याकडे विनंती केली. धोनीनेही ही विनंती मान्य करत त्यांच्या शर्टवर स्वाक्षरी दिली. नंतर त्यांनी गळाभेटही घेतली. या घटनेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला.

IPL 2023 Best Moments
याला म्हणातात खिलाडूवृत्ती! चॅम्पियन CSK वर अन्य नऊ IPL संघांकडून कौतुकाचा वर्षाव; पाहा ट्वीट्स

5. जयस्वालची जलद अर्धशतक

आयपीएल 2023 स्पर्धेत 11 मे रोजी राजस्थान रॉयल्सने ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 47 चेंडूत नाबाद 98 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 5 षटकार मारले.

विशेष म्हणजे त्याने 13 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. त्यामुळे जयस्वाल आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला.

6. वॉर्नर-जड्डूची जुगलबंदी

आयपीएल 2023 मधील २० मे रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजीवेळी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू रविंद्र जडेजा यांच्यात गमतीशीर घटना घडली.

जडेजा मुद्दामहून फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरला धावबादसाठी घाबरवत होता. त्यावेळी वॉर्नरनेही गमतीने क्रिजमध्ये न परतता जडेजाच्या आयकॉनिक स्टाईलमध्ये तलवारीसारखी आपली बॅट फिरवली. हे पाहून नंतर सर्वच जण हसायला लागले होते. हा क्षणही सर्वांच्या लक्षात राहणारा क्षण होता.

7. शुभमन गिलची शतके

शुभमन गिलने आयपीएल 2023 स्पर्धा गाजवली. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या गिलने या हंगामात तब्बल 3 शतके केली. गिलने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स 60 चेंडूत 129 धावांची खेळी केली. त्याआधी त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 101 धावांची खेळी केली होती, तसेच त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद 104 धावांची खेळी केली होती.

त्यामुळे तो एका आयपीएल हंगामात 3 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2016 साली विराट कोहलीने 4 शतके आणि 2022 साली जॉस बटलरने 4 शतके केली आहेत.

गिल आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला त्याने 17 सामन्यात 890 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com