कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर बुधवारी रात्री एफसी गोवाने पश्चिम बंगालवर 2-1 असा विजय नोंदविला. त्या लढतीत इंज्युरी टाईमच्या चौथ्या मिनिटास बेदियाच्या फ्रीकिकचे गोलमध्ये रुपांतर झाले.
एफसी गोवा संघ सामन्यातील शेवटच्या शिट्टीपर्यंत मैदानावर विजयी ध्येय बाळगून खेळला, असे मत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पश्चिम बंगालविरुद्ध इंज्युरी टाईममध्ये निर्णायक गोल केलेल्या एदू बेदिया याने व्यक्त केले.
सातव्या मिनिटास कर्णधार ब्रँडन फर्नांडिसने एफसी गोवास आघाडी मिळवून दिल्यानंतर ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने पेनल्टीवर पश्चिम बंगालसाठी बरोबरीचा गोल केला होता.
आपल्या यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या गोलविषयी ब्रँडनने सांगितले, की ‘‘हा अत्यंत खास गोल आहे. चाहत्यांच्या साक्षीने गोल केल्यामुळे त्याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. मी सांघिक कामगिरीस पूर्ण श्रेय देईन. आम्ही अथक मेहनत घेत अपेक्षित निकाल मिळविला. चांगल्या सुरवातीवर आता आम्हाला भक्कम बांधणी करायची आहे,’’ असे ब्रँडनने सामन्यानंतर सांगितले.
बेदियाचा संघासाठी मौल्यवान गोल
‘‘ड्युरँड कप अंतिम लढतीप्रमाणे हा गोल होता. आम्हाला महत्त्वाचा विजय मिळाला, त्यामुळे गोल आणखीन मौल्यवान ठरला,’’ असे बेदियाने सांगितले. दोन वर्षांपूर्वी त्याच्या निर्णायक गोलमुळे एफसी गोवाने ड्युरँड कप जिंकला होता. ‘‘सामना खडतर होता. संघात थोडेसे नैराश्य होते, पण अखेरीस आम्हाला खूप सकारात्मक बाबी पाहायला मिळाल्या. शेवटच्या शिट्टीपर्यंत विजयाचेच ध्येय होते आणि त्यासाठी कठीण टप्प्यात प्रत्येकाने एकमेकाची पाठराखण केली. गतमोसमात सुरवातीच्या तीन पराभवानंतर आमच्या शिडातील हवाच निघून गेली होती, त्यामुळे प्रारंभीच मिळविलेल्या या विजयाचे महत्त्व आम्ही जाणतो,’’ असे बेदियाने सामन्यानंतर स्पष्ट केले.
‘‘सामन्याच्या पहिल्या अर्धात चेंडूवर नियंत्रण राखत आम्ही प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात वर्चस्व राखले. दुसऱ्या अर्धात आम्हाला किंचित फटका बसला, काही प्रमाणात चेंडूवरील नियंत्रण गमावले आणि ईस्ट बंगालने आम्हाला त्रास देण्यास सुरवात केली. मात्र सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात आम्ही मुसंडी मारण्यास सुरवात केली आणि प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात खेळू लागलो. बेंचवरून आलेल्या खेळाडूंमुळे पासेस वाढले आणि त्यामुळे बळ प्राप्त झाले. अखेरीस एदूच्या गोलमुळे आम्हाला अपेक्षित भेट मिळाली.’’
- कार्लोस पेनया (प्रशिक्षक- एफसी गोवा)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.