Moeen Ali fined: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 16 जूनपासून ऍशेस मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना बर्मिंगघमला होत असून या सामन्यातून मोईन अलीने जवळपास दोन वर्षांनी कसोटीत पुनरागमन केले आहे. पण पुनरागमनाच्या सामन्यातच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
आयसीसीने रविवारी (18 जून) या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. विशेष म्हणजे रविवारी मोईनचा 36 वा वाढदिवस होता. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार मोईनने आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्याच्यावर सामना शुल्काच्या 25 टक्के दंड आकारण्यात आला असून लेव्हल 1च्या चूकीसाठी एक डिमिरिट पाँइंटही त्याला देण्यात आला आहे.
मोईन अलीवर आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.20 चे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे कलम खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध आचरण करण्याबद्दल आहे. दरम्यान, गेल्या 24 महिन्यातील ही मोईन अलीची पहिलीच चूक असल्याचे आयसीसीने सांगितले आहे.
झाले असे की ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 89 व्या षटकात मोईनने त्याच्या गोलंदाजी करणाऱ्या हातावर बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत असताना स्प्रे मारला होता. त्याने हा स्प्रे पंचांच्या परवानगीशिवाय मारल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
मोईनने त्याची चूक मान्य केली आहे. त्याला आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी दोषी ठरवले होते. त्याला दोषी ठरवताना सामनाधिकारी यांना पटले की त्याने स्प्रे फक्त त्याची बोटे आणि हात सुकवण्यासाठी मारला होता. त्याने चेंडूशी कोणतीही छेडछाड करण्याच्या हेतूने ही कृती केली नव्हती. तसेच त्याच्या स्प्रेमुळे चेंडूवर कोणताही परिणाम झाला नाही.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी 8 बाद 393 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. इंग्लंडकडून जो रुटने 118 धावांची खेळी केली होती. तसेच जॉनी बेअरस्टोने 78 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने 4 विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 386 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 7 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 141 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून स्टुअर्ड ब्रॉड आणि ऑली रॉबिन्सनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
तसेच तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 2 बाद 28 धावा केलेल्या आहेत. त्यामुळे सध्या इंग्लंडकडे 35 धावांची आधाडी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.