पणजी : भारताचा आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक अनिरुद्ध थापा याच्याशी चेन्नईयीन एफसीने आणखी दोन वर्षांसाठी करार केला आहे. त्यामुळे 24 वर्षीय खेळाडू 2024 पर्यंत चेन्नई येथील संघात असेल. या संघात तो 2016 साली रुजू झाला होता.
डेहराडून येथे जन्मलेला अनिरुद्ध चेन्नईयीन एफसी संघाचा आधारस्तंभ गणला जातो. तो संघात असताना चेन्नईयीनने दोन वेळा आयएसएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, 2017-18 मध्ये विजेतेपद पटकावले. एकूण सहा आयएसएल मोसम, एएफसी कप आणि सुपर कप स्पर्धेत मिळून अनिरुद्ध चेन्नईयीन एफसीतर्फे 101 सामने खेळला आहे. या क्लबतर्फे सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांत तो जेरी लालरिनझुआला (103 सामने) याच्यानंतर दुसरा फुटबॉलपटू आहे. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत त्याने चेन्नईयीन एफसीचे नेतृत्व केले.
‘‘चेन्नईयीन एफसी माझ्यासाठी एकप्रकारे कुटुंबच आहे. चेन्नई माझे घर बनले आहे, त्यामुळे निर्णय घेताना मी अवघडलो नाही,’’ असे अनिरुद्धने सांगितले. 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर तो भारतातर्फे आतापर्यंत 24 सामने खेळला आहे. दोन वेळा त्याने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.